३० वर्षे सत्ता उपभोगणाऱ्यांनी पीक विम्यासाठी पुढाकार घ्यावा, अन्यथा गावागावातील शेतकरी सत्ताधाऱ्यांना हिसका दाखवतील;
युवा नेते ऋषांक चव्हाण यांचा सत्ताधार्यांवर हल्लाबोल! ज्ञानेश्वर टाले म्हणाले, सत्ताधारी आमदारांना गावात पाय ठेवू देणार नाही....
Updated: Oct 14, 2024, 09:36 IST
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर विधानसभा मतदारसंघात ३० वर्षांपासून सत्ता त्यांच्या ताब्यात आहे, मात्र केवळ खुर्च्या उबवण्याचे काम सत्ताधारी खासदार - आमदार करत आहेत. अनेक मायबाप शेतकऱ्यांना पीक विमा अद्याप मिळाला नाही. मात्र शेतकरी मेला तरी त्यांना फरक पडत नाही..आता विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने सामान्यांचा पुळका आल्यासारखे ते वागत आहे..तिकडे काय करायचे ते करा..पण थोडीशी जनाची नाहीतर मनाची लाज असेल तर शेतकऱ्यांच्या पीकविम्यासाठी पुढाकार घ्या..अन्यथा गावागावांतील शेतकरी तुम्हाला हिसका दाखविल्याशिवाय राहणार नाही असा हल्लाबोल युवा शेतकरी नेते ऋषांक चव्हाण यांनी केला. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या मार्गदर्शनात मेहकर विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या गावभेट दौऱ्यादरम्यान गणपुर, दादुलगव्हाण, चिंचोली बोरे येथे शेतकऱ्यांच्या बैठका झाल्या..या बैठकांना संबोधित करतांना ऋषांक चव्हाण बोलत होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांचीही यावेळी उपस्थिती होती..
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या मार्गदर्शनात मेहकर विधानसभा मतदारसंघात डॉ.ज्ञानेश्वर टाले व युवा शेतकरी नेते ऋषांक चव्हाण पीक विम्या संदर्भात शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी गाव भेट दौरे करत आहेत. डॉ.ऋतुजा ऋषांक चव्हाण यांचेदेखील मतदारसंघात दौरे सुरू आहेत. गावागावात होणाऱ्या कॉर्नर बैठकांना प्रचंड प्रतिसाद मिळत असून सामान्य जनता सत्ताधारी आमदारांना कंटाळली असल्याचे ऋषांक चव्हाण यांनी सांगितले. मेहकर विधानसभा मतदारसंघात आता राजकीय परिवर्तनाचा निर्धार जनतेने केला असल्याचेही ते म्हणाले..
पुढाऱ्यांना गावात पाय ठेवू देणार नाही: डॉ. टाले
जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे जमा होत नाहीत तोपर्यंत आमचा लढा सुरू राहील. सरकारच्या विरोधात वणवा पेटेल, सरकारला पळता भुई थोडी केल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा घणाघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी केला. जोपर्यंत पीक विम्याचा विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत सत्ताधारी आमदारांना गावात पाय ठेवू देणार नाही असा निर्धार आता शेतकऱ्यांनी केल्याचे ते म्हणाले. यावेळी राजू बोरे, राजगुरू अण्णा व मोठ्या संख्येने गावागावातील शेतकरी उपस्थित होते...