ही निवडणूक आरक्षण वाचवण्यासाठी! मेहकरच्या सभेतून ॲड.प्रकाश आंबेडकरांचा एल्गार! डॉ.ऋतुजा चव्हाणांना सभागृहात पाठवण्याचे आवाहन

 
 
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकरच्या स्वातंत्र्य मैदानात वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांची आज जाहीर सभा पार पडली. मेहकर विधानसभा मतदारसंघाच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार डॉ.ऋतुजा चव्हाण यांच्या प्रचारानिमित्त आयोजित या सभेला प्रचंड गर्दी उसळली होती..या सभेत ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी सत्ताधारी महायुतीसह महाविकास आघाडीवरही ताशेरे ओढले. यंदाची ही निवडणूक एका वेगळ्या वळणावर आलेली आहे.ही निवडणूक ओबीसी, एससी, एसटी समाजाचे आरक्षण वाचवण्याची लढाई आहे. आंदोलने करून मोर्चे काढून हे होणार नाही तर सभागृहात लढण्याची ही लढाई आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार डॉ.ऋतुजा चव्हाण यांना प्रचंड मतांनी विजयी करून सभागृहात पाठवा असे आवाहन यावेळी जाहीर सभेतून ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी केले. यावेळी धैर्यवर्धन फुंडकर, डॉ.ज्ञानेश्वर टाले यांच्यासह वंचित बहुजन आघाडी व शेतकरी चळवळीतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते..
 यावेळी पुढे बोलतांना ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, देशाची घटना धोक्यात आहे. मोदी जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तेव्हा संविधान उचलतात मात्र ही नौटंकी आहे असा आरोपही ॲड. आंबेडकर यांनी केला. ओबीसींच्या ताटातील हक्काचे आरक्षण काढल्यास सामाजिक सलोखा टिकणार नाही असेही ते म्हणाले.
  धर्मावर खतरा नाही, आरक्षणावर..
 ओबीसींनो सावधान व्हा, सध्या धर्मावर खतरा नाही तर तुमच्या आरक्षणावर संकट आहे.जसे ओबीसींचे आरक्षण धोक्यात आहे तसेच एससी एसटीचे आरक्षण देखील धोक्यात आहे. चर्मकार, मातंग,बौद्ध या समाजाचे आरक्षण धोक्यात आहे. ही लढाई आंदोलन करून किंवा मोर्चे काढून होणार नाही तर त्यासाठी सभागृहात आपला आमदार पाहिजे. डॉ.ऋतुजा चव्हाण यांच्या रूपाने सभागृहात आपला हक्काचा आमदार पाठवा असेही ॲड.प्रकाश आंबेडकर म्हणाले. मेहकर मध्ये पैसा आलेला आहे.पोलिसांना सांगतो ४० कोटी आलेले आहेत. तुम्ही धाडी घालून वाटून खा असेही प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले. 
ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट...
 यावेळी बोलताना डॉ .ऋतुजा चव्हाण म्हणाल्या की, बाळासाहेब माझ्या प्रचारासाठी इथे आले ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. त्यांची तब्येत बरी नसतानाही ते माझ्यासाठी इथे आले मी त्यांना खूप खूप धन्यवाद देते असे.डॉ.ऋतुजा चव्हाण म्हणाल्या. बाळासाहेबांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याला तडा जाऊ देणार नाही. महाविकास आघाडीचा उमेदवार बोऱ्याबिस्तर बांधून निवडणुकीनंतर फरार होणार आहे. त्यामुळे आपण स्थानिक उमेदवाराला आशीर्वाद द्याल असा विश्वास असल्याचे त्या म्हणाल्या. महायुतीच्या इथल्या आमदारांनी मतदारसंघाची वाट लावली. गावोगावी रस्त्यांची, पांदण रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. ते तुमच्या कडे मटणाच्या पिशव्या घेऊन येतील दारू घेऊन येतील मात्र कुठल्याही अमिषाला बळी पडू नका असे डॉ.ऋतुजा चव्हाण म्हणाल्या.