ELECTION SPECIAL अर्ज भरण्याचे उरले अवघे २ दिवस! आज उद्या जिल्हाभरात अर्ज भरणाऱ्यांची झुंबड ; ४ दिवसांत ७ मतदारसंघात केवळ ३० अर्ज; बुलडाण्यात अद्याप भोपळा....

 
 बुलडाणा(राहुल रिंढे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे.२२ ऑक्टोबर पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. आता केवळ आज २८ ऑक्टोबर आणि २९ ऑक्टोबर हे दोनच दिवस अर्ज भरण्यासाठी हातात आहे. त्यामुळे या २ दिवसांत अर्ज भरणाऱ्यांची चांगलीच झुंबड उडणार आहे.उद्या २९ ऑक्टोबरच्या दुपारी ३ वाजेपर्यंतच उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे...

  २२ ते २५ ऑक्टोबर या ४ दिवसांत जिल्ह्यात ७ मतदारसंघात केवळ ३० अर्ज दाखल करण्यात आले. २६ आणि २७ ऑक्टोबर या दिवशी शनिवार रविवार असल्याने सुट्टी होती. गेल्या ४ दिवसांत सिंदखेराजात डॉ.राजेंद्र शिंगणे आणि मेहकर येथे डॉ.संजय रायमुलकर याच प्रमुख उमेदवारांनी अर्ज भरले.चिखलीत रिपाई आठवले गटाच्या नरहरी गवई यांनी अर्ज भरला.या व्यतिरिक्त प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी अद्याप अर्ज दाखल केलेले नाही.चिखली विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत ६, सिंदखेडराजा मतदारसंघात ६,मेहकर विधानसभा मतदारसंघात ८, खामगाव मतदारसंघात ५, मलकापूर मध्ये ४ जळगाव जामोद मध्ये एका उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे बुलडाणा विधानसभा मतदारसंघात अद्याप एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही...