ELECTION SPECIAL डॉ.शशिकांत खेडेकरांसाठी वाट मोकळी! सिंदखेडराजात दोन डॉक्टरांची लढाई रंगणार; "ऑपरेशन" कुणाचे सक्सेस?

 
 बुलडाणा(कृष्णा सपकाळ:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): हो नाही हो नाही म्हणता म्हणता बहुचर्चित सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे चित्र आता स्पष्ट होताना दिसत आहे. "कार्यकर्त्यांच्या मनातील निर्णय घेईल.. ९९ टक्के कार्यकर्त्यांची इच्छा मी तुतारी कडून लढावी अशी आहे." असे म्हणत आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी त्यांचे इरादे स्पष्ट केले आहेत. डॉ.शिंगणे यांच्या भूमिकेमुळे सध्या इच्छुकांमध्ये "कही खुशी कही गम" असे चित्र आहे. महाविकास आघाडी कडून इच्छुक असलेले गोंधळात तर महायुतीकडील इच्छुक अर्थात आनंदात आहेत.आ.डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या भूमिकेने माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांची वाट मोकळी झाली आहे.त्यामुळे विधानसभा निवडणुकीत दोन डॉक्टरांमधील लढाई पहायला मिळणार असून "ऑपरेशन" कोण सक्सेस करणार हे २३ नोव्हेंबरला कळणार आहे...

गेल्या महिनाभरापासून डॉ.राजेंद्र शिंगणे तुतारी हाती घेणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. डॉ.शिंगणे यांच्या भूमिकेमुळे दोन्हीकडील इच्छुक कन्फ्युज होते. मात्र अखेर आता हे संभ्रमाचे वातावरण दूर झाले आहे. तुतारी हाती घेण्याची अधिकृत घोषणा डॉ.शिंगणे यांनी केली नसली तरी कार्यकर्त्यांच्या मनातील निर्णय घेणार - ९९ टक्के कार्यकर्त्यांची इच्छा मी तुतारी कडून लढावी अशी असल्याचे काल ते माध्यमांशी बोलताना म्हटले होते. डॉ.शिंगणे यांच्या वक्तव्याचा योग्य तो अर्थ काढीत आता महायुतीच्या इच्छुकांकडून मोर्चे बांधणी सुरू करण्यात आली आहे. या मोर्चेबांधणीत माजी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर आघाडीवर आहेत...

 कुणाचे ऑपरेशन सक्सेस होणार?
  
 आ.डॉ.शिंगणे शरद पवार गटात गेल्यास महायुतीच्या जागा वाटपात सिंदखेड राजाच्या जागेवर पहिला हक्क अजित पवार गटाचा राहील. मात्र अजित पवार गटाकडे सिंदखेडराजात पाहिजे तेवढा सक्षम उमेदवार नाही. शिंदेंच्या शिवसेनेने याआधीच डॉ.शिंगणे असतील तरच जागा तुम्हाला नाहीतर आम्हाला असे अजित पवारांना स्पष्ट सांगितले आहे. त्यामुळे सिंदखेड राजाची जागा शिंदेंच्या शिवसेनेलाच सुटण्याची दाट शक्यता आहे. उमेदवार म्हणून माजी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांचे नाव जवळपास निश्चित आहे. त्यामुळे पुन्हा एकदा डॉ.राजेंद्र शिंगणे विरुद्ध डॉ.शशिकांत खेडेकर अशी दोन डॉक्टरांची लढाई पहायला मिळणार आहे. आता ऑपरेशन कोण यशस्वी करतो हे २३ नोव्हेंबरला कळेल,मात्र त्याआधी प्रचाराची योग्य "उपचार पद्धती" दोन्ही डॉक्टरांना वापरावी लागणार आहे...
   याआधी अशी झाली होती लढत....
   २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सगळेच पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी रिंगणातून माघार घेत राष्ट्रवादीच्या रेखाताईंना पुढे केले होते. डॉ.शशिकांत खेडेकर यांनी ६४ हजार २०३ मते घेत निवडणुकीत विजय मिळवला होता. भाजपचे डॉ.गणेश मांटे ४५ हजार ३४९ मते घेत दुसऱ्या तर तिसऱ्या क्रमांकावरील रेखाताईंना ३७ हजार १६१ मते मिळाली होती. गत २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा आ.डॉ. राजेंद्र शिंगणे यांची एन्ट्री झाली. ८१ हजार ७०१ मते त्यांनी पुन्हा विजय मिळवला. दुसऱ्या क्रमांकावरील डॉ.शशिकांत खेडेकरांना ७२ हजार ७६३ मते मिळाली होती. वंचितच्या सविता मुंडेंनी तब्बल ३९ हजार ८७५ मते मिळवली होती...