श्वेताताईंच्या चिखली येथील प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनावेळी दिसली आली महायुतीची एकजूट! धाड, रायपूर, उदयनगर व अमडापूर येथे झाला प्रचाराचा शुभारंभ!

 
 चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या वतीने निवडणूक लढवणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार आ. श्वेताताई महाले यांच्या चिखली येथील खंडाळा रोडवर सुरू करण्यात आलेल्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे दि. २ नोव्हेंबर रोजी बलिप्रतिपदेच्या शुभ मुहूर्तावर उद्घाटन झाले. याशिवाय आजपासून धाड, रायपूर, अमडापूर व उदयनगर अशा अन्य चार सर्कलमध्ये प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी महायुतीमध्ये असलेल्या भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, रयत क्रांती संघटना आदी घटक पक्षांची एकजूट प्रकर्षाने दिसून आली.       
 चिखली येथील मध्यवर्ती प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम जेष्ठ नेते एड. मंगेश व्यवहारे यांच्या अध्यक्षतेखाली व पार पडला. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामकृष्णदादा शेटे यांनी या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष शंतनु बोंद्रे व पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष भाई विजय गवई हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. चिखली येथील प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त, प्रदेश कार्यकारणी सदस्य विजय कोठारी, प्रकाश महाराज जवंजाळ, सुनील वायाळ, डॉ. प्रतापसिंह राजपूत, जिल्हा उपाध्यक्ष मनोज दांडगे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव देशमुख, तालुकाप्रमुख गजानन मोरे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मायाताई म्हस्के, प्रचार कार्यालयाचे प्रमुख प्रेमराज भाला, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पोफळे, कृष्णकुमार सपकाळ, सुरेंद्र पांडे, ज्येष्ठ नेते रामदासभाऊ देव्हडे, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख अनीस, ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष सुदर्शन खरात, युवा मोर्चा शहराध्यक्ष सागर पुरोहित आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. 
प्रत्येक सर्कलमधून मिळेल श्वेताताईंना मताधिक्य - मनोज दांडगे
         याप्रसंगी आपल्या भाषणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज दांडगे यांनी आ. श्वेताताई महाले यांच्या विकास कार्यामुळे चिखली मतदारसंघ प्रगतीच्या मार्गावर केवळ अडीच वर्षात अग्रेसर झाल्याचे मत व्यक्त केले. ग्रामीण भागातील प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलमध्ये श्वेताताई महाले यांना मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. महायुतीमधील सर्व पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीतून प्रत्येक सर्कलमधून महायुतीच्या उमेदवार असलेल्या आ. महाले यांना मताधिक्य मिळेल असा विश्वास दांडगे यांनी व्यक्त केला. 
विकासाला अधिक गती देण्यासाठी पुन्हा श्वेताताईंना विजयी करावे - शिवाजीराव देशमुख
           महायुतीचे सरकार राज्यात सत्तेवर आल्यापासून या सरकारने सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला, युवक यांच्यासाठी आपला खजिना खुला केला आहे. आ. श्वेताताई महाले यांनी महायुती सरकारच्या प्रत्येक योजनेची चिखली मतदारसंघात उत्तम रीतीने अंमलबजावणी केली असून त्याचे लाभ तळागाळापर्यंत पोहोचवले आहेत. याचा परिणाम या निवडणुकीत दिसून येणार असल्याने महायुती मधील शिवसेनेसह सर्वच घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सर्व शक्तीनिशी श्वेताताई महाले यांचा प्रचार करावा व मतदारसंघातील विकासाला अधिक गतिमान करण्यासाठी पुन्हा आ. श्वेताताई महाले यांनाच विजयी करावे असे आवाहन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव देशमुख यांनी यावेळी केले. 
काँग्रेसने दडपशाही केली मात्र श्वेताताईंनी विकास केला - भाई विजय गवई
             या विधानसभा निवडणुकीत विरोधकांकडे कोणतेही मुद्दे नाहीत. लोकसभेमध्ये संविधान बदल आणि आरक्षणाचे फेक नॅरिटीव्ह यावेळेस चालणार नाही. श्वेताताई महाले यांनी दलित व मुस्लिम समाजाची कधी नव्हे एवढी विकास कामे केली आहेत. मुस्लिम धर्मियांसाठी ठिकठिकाणी शादीखाने तर बौद्ध समाजासाठी बुद्ध विहार तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचे लाभ देखील दलित व मुस्लिम समाजापर्यंत श्वेताताईंनी पोहोचवले. त्यामुळे हे दोन्ही समाज श्वेताताईंच्या पाठीशी मागे उभे राहतील असा विश्वास पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष भाई विजय गवई यांनी व्यक्त केला. काँग्रेसच्या स्थानिक उमेदवाराने दलितांना भ्रमित करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पणतूला मतदारसंघात गावोगावी प्रचारासाठी फिरवणे सुरू केले आहे. मात्र, या उपायाने काहीही फरक पडणार नाही कारण, काँग्रेसने केलेली दडपशाही व कुमशाही याला जनता त्रस्त झाली असून श्वेताताईंनी केलेल्या विकासकामांची जाणीव ठेवून आंबेडकरी समाज त्यांच्या सोबत राहील अशी ग्वाही गवई यांनी आपल्या भाषणातून दिली. 
प्रत्येक मत खेचून आणा - प्रकाश महाराज जवंजाळ
              आ. श्वेताताई महाले यांनी केवळ अडीच वर्षात चिखली मतदारसंघात केलेले विकासकार्य खरोखरच उल्लेखनीय आहे. याचे लाभ येणाऱ्या काळात देखील मिळावे यासाठी महायुतीमधील भारतीय जनता पक्षासह सर्वच घटक पक्षांनी एकजूट दाखवून शहर आणि ग्रामीण भागातील प्रत्येक मत श्वेताताईंसाठी खेचून आणावे व सलग दुसरा विजय प्रयत्नपूर्वक साकार करावा असे आवाहन याप्रसंगी भाजपा प्रदेश कार्यकारीणी सदस्य प्रकाश महाराज जवंजाळ यांनी केले. 
प्रत्येक कार्यकर्त्याने आपली जबाबदारी पार पाडावी - आ. श्वेताताई महाले
   
               या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेवर येणार असल्याने चिखली मतदारसंघातून देखील महायुतीलाच विजयी करणे आवश्यक आहे, त्याकरिता महायुतीमधील प्रत्येक घटक पक्षाच्या कार्यकर्त्याने प्रयत्नांची शिकस्त करावी असे आवाहन आ. श्वेताताई महाले यांनी आपल्या भाषणातून केले. ग्रामीण भागातून प्रत्येक सर्कलमध्ये आपल्याला निश्चितच आघाडी मिळेल परंतु ही आघाडी विजयामध्ये रूपांतरित करण्यासाठी चिखली शहरातील प्रत्येक प्रभागामधून सुद्धा आपण मताधिक्य मिळवण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. त्यामुळे कोणीही गाफील न राहता आपण केलेल्या विकास कामांची माहिती शेवटच्या माणसापर्यंत प्रभावीपणे पोहोचवावी, विरोधकांचा अपप्रचार खोडून काढावा व प्रत्येक बुथवर आपल्याला विरोधकावर कशी मात करता येईल यासाठी एकजुटीने प्रयत्न करावा असे आवाहन आ. श्वेताताई महाले यांनी केले.
धाड, रायपूर, उदयनगर व अमडापूर येथे प्रचाराचा शुभारंभ
        आज चिखली येथे मध्यवर्ती प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाबरोबरच ग्रामीण भागात देखील आ. श्वेताताई महाले यांच्या प्रचार कार्याचा शुभारंभ करण्यात आला. यानिमित्त धाड येथे आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आरोग्य भारतीचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. सुनील जोशी हे होते. शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंह राजपूत यांच्या हस्ते धाड सर्कल मधील प्रचाराचा शुभारंभ संपन्न झाला. रायपूर सर्कलमध्ये भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य सुरेशअप्पा खबुतरे यांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ झाला. ज्येष्ठ भाजपा नेते अंबादास घाडगे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. उदयनगर येथे प्रचाराचा शुभारंभ ज्येष्ठ नेते काकाजी कलंत्री यांच्या हस्ते पार पडला. भाजपाचे माजी शहराध्यक्ष अशोक लाहुडकर हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर अमडापूर येथे भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजय कोठारी यांनी आ. श्वेताताई महाले यांच्या प्रचाराचा शुभारंभ केला. ज्येष्ठ भाजपा नेते विकास डाळिंबकर याप्रसंगी अध्यक्षस्थानी होते.