EXCLUSIVE चिखलीच्या रणांगणातून दोघांची माघार! सिंदखेडराजा, मेहकर, बुलडाणा अजूनही जैसे थे! उद्या, रविवार..अर्ज मागे घेण्यासाठी फक्त सोमवारी दुपारी ३ पर्यंतचा वेळ...
Nov 2, 2024, 17:01 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाची तारीख जसजशी जवळ येणार आहे तशी रंगत आणखी वाढणार आहे. ४ नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्यासाठी शेवटचा दिवस आहे, अशात आज २ नोव्हेंबर पर्यंत केवळ चिखली विधानसभा मतदारसंघातून दोघांनी माघार घेतली आहे..घाटावरील मेहकर, बुलडाणा आणि सिंदखेड राजा मतदारसंघातील परिस्थिती जैसे थे आहे..आता उद्या,३ नोव्हेंबरला रविवार असल्याने अर्ज मागे घेता येणार नाही, त्यामुळे सोमवारचा दिवस शेवटचा राहणार आहे.सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंतच उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे..त्यानंतर सर्वच लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे..
घाटावरील चारही मतदारसंघात बंडखोरांनी थैमान घातले आहे. त्यामुळे बंडोबांना शांत करण्यासाठी त्या त्या पक्षांकडून प्रयत्न सुरू आहेत. सिंदखेडराजा मतदारसंघात तर आगळा वेगळा पेच निर्माण झाला आहे, इथे महायुतीच्या शिवसेनेकडून
डॉ.खेडेकरांनी उमेदवारी अर्ज दाखल केला दुसरीकडे महायुतीचा घटक पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीने देखील इथे मनोज कायंदे यांना उमेदवारी दिली आहे.त्यामुळे दोघांपैकी एकाला माघार घ्यावी लागते की दोघांनाही लढायची परवानगी मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मेहकर मतदारसंघात महायुतीच्या सिद्धार्थ खरातांनी उमेदवारी मिळवली आहे,मात्र काँग्रेसच्या लक्ष्मण घुमरेंनी व गोपाल बछिरे यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे त्यांनी अर्ज मागे घेतला नाही तर खरात यांना मोठी अडचण निर्माण होणार आहे. बुलडाणा विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून संजय गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे..मात्र भाजपनेते विजयराज शिंदे यांनी देखील उमेदवारी अर्ज भरला आहे, त्यामुळे आता विजयराज शिंदे नेमकी कोणती भूमिका घेतात यावर बुलडाणा येथील लढतीचे चित्र बऱ्यापैकी अवलंबून राहणार आहे..
चिखली विधानसभा मतदारसंघात कुणाल गायकवाड यांनी भरलेला उमेदवारी अर्ज अद्याप मागे घेतलेला नाही, विजयराज शिंदे यांनी माघार घेतली तरच माघार अशी भूमिका कुणाल गायकवाड यांनी घेतली आहे.कुणाल गायकवाड यांनी अपक्ष म्हणून चिखली येथे भरलेला अर्ज आ.गायकवाड यांची बुलडाण्यातील ताकद कमी करू शकतो..कुणाल गायकवाड यांच्यावर प्रचार यंत्रणेची बहुतांश जबाबदारी असल्याने कुणाल गायकवाड यांच्यावर असल्याने ते माघार घेऊ शकतात अशी स्थिती आहे. चिखली विधानसभा मतदारसंघात आजपर्यंत २ उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे. अपक्ष उमेदवार राजेंद्र सुरेश पडघान आणि अब्दुल वाहिद शेख इस्माईल यांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत...