मशाल पेटली..! अभूतपूर्व आणि अतिविराट आक्रोश मोर्चा ने बुलडाणा दणाणले; खा.अरविंद सावंतांची प्रखर टीका, म्हणाले हा धर्मवीर नाही कर्मदरिद्री! तुमचा आमदार विकला गेला म्हणाले!

 जालिंधर बुधवतांवर कौतुकाचा वर्षाव, म्हणाले बुधवंत म्हणजे निष्ठावंत.....

 

 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांच्या पुढाकारातून आणि खा.अरविंद सावंत आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज, बुलडाण्यात निघालेला आक्रोश मोर्चा अतिविराट, अतिविशाल आणि अभूतपूर्व असा ठरला. जिजामाता प्रेक्षागर मैदानाजवळून सुरू झालेला हा मोर्चा संगम चौक, जयस्तंभ चौक, बाजार गल्ली, कारंजा चौक मार्गे बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्यानंतर खा.अरविंद सावंत, अंबादास दानवे, नरेंद्र खेडेकर यांची वादळी भाषणे झाली. त्याआधी जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांनी मशाल यात्रा आणि आक्रोश मोर्चा मागची भूमिका विषद केली. खा.अरविंद सावंत यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणांचा खरपूस समाचार घेतला. आ.संजय गायकवाड यांच्यावरही त्यांनी नाव न घेता प्रखर टीका केली. "हा कसला धर्मवीर हा तर कर्मदरिद्री, तुमचा आमदार विकला गेलेला आहे, गद्दार आहे असा प्रहार सावंत यांनी केला.

भाषणाच्या सुरुवातीलाच खा.अरविंद सावंत यांनी तोंडभरून कौतुक केले. जालिंधर बुधवंत म्हणजे निष्ठावंत अशी व्याख्या खा.सावंत यांनी केली, यावेळी त्याला दाद देत टाळ्या आणि शिट्ट्यांचा एकच गजर झाला. प्रचंड रखरखत्या उन्हात देखील हजारो शेतकरी मोर्चात सहभागी झाल्याचे पाहून मोर्चेकऱ्यांना उद्देशून खा.अरविंद सावंत म्हणाले की डोकी तापली आहेत, केवळ डोकी तापवून होणार नाही..मने तापवा..मशाल पेटवा असे खा.सावंत म्हणाले.
 देशात आणि राज्यात महिलांवर प्रचंड अत्याचार होत आहे. एक दिवसही असा जात नाही ज्या दिवशी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत नाहीत. हे सरकार शेतकऱ्यांचे सरकार नाही तर उद्योगपतींचे सरकार आहे असा घणाघात खा.अरविंद सावंत यांनी केला.
कलंक धुवून काढा...
इथला आमदार जसा वागतोय त्या आमदाराचा छत्रपती शिवाजी महाराजांनी चौरंग केला असता. पुढच्या निवडणुकीत तुम्ही चौरंग करा आणि मशाल पेटवा असे खा.सावंत म्हणाले. आगामी विधानसभा निवडणुकीत बुलढाणा विधानसभा मतदारसंघाला लागलेला कलंक धुवून टाका असे आवाहन खा.अरविंद सावंत यांनी केले. पोलीस प्रशासन आणि कलेक्टर सत्ताधाऱ्यांचे गुलाम झाले आहेत, एकदा ते जाहीर करा असे म्हणत इथे पोलिसांना देखील आमदाराची गाडी धुवावी लागते असे खा.सावंत म्हणाले. विधानसभा निवडणुकीत बुलडाणा विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे जो उमेदवार देतील त्या उमेदवाराला प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन खा.सावंत यांनी शेवटी केले.