भरधाव वाळूच्या टिप्परचा थरार; चार मेंढ्यांचा जागीच चेंदामेंदा; तरवाडी फाट्यावर धक्कादायक घटना; वाळू माफियांच्या सुसाट वाहतुकीने नागरिकांत संताप...

 
 मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून बेकायदेशीर वाळू वाहतुकीने अक्षरशः हाहाकार माजवला असून वाळू माफियांची वाहने सुसाट वेगाने धावत आहेत. यामुळे किरकोळ अपघातांची मालिका सुरू असतानाच सोमवारी एक गंभीर आणि धक्कादायक घटना घडली.
आज दुपारी सुमारे बारा वाजता तरवाडी फाटा परिसरात सीमा गजानन शिंदे हे आपल्या शेळ्या-मेंढ्या चारण्यासाठी रस्त्यालगत जात असताना नांदूरा येथून मोताळ्याकडे भरधाव वेगाने येणाऱ्या वाळूने भरलेल्या टिप्पर थेट मेंढ्यांच्या कळपात शिरला. या भीषण अपघातात चार मेंढ्यांचा जागीच चेंदामेंदा झाला.
या घटनेत मेंढपाळाचे अंदाजे ६० ते ७० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने मेंढपाळ बचावले असले, तरी वाळू माफियांच्या बेफिकीर वाहनचालकांमुळे नागरिकांसह जनावरांचेही जीव धोक्यात आले आहेत.
या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून महसूल व पोलीस प्रशासनाने मोकाट सुटलेल्या वाळू माफियांवर तात्काळ व कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, प्रशासन आता तरी या बेकायदेशीर वाळू वाहतुकीकडे गांभीर्याने लक्ष देणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.