राज्याला प्रदेशाध्यक्ष दिला! आता इज्जत वाढवण्याची जबाबदारी जिल्हा काँग्रेसची!
बुलडाण्याच्या एल्गार मोर्चात मरगळ दिसली; वरून आदेश आला म्हणून काढला मोर्चा; "फ्लॉप–शो" ची जबाबदारी कोण घेणार?
Mar 3, 2025, 20:04 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी बुलडाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती गेल्या महिन्यात झाली. सर्वसामान्य बुलडाणेकरांसाठी ही नियुक्ती सुखावह होती. आपल्या माणसाची काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती होते ही बाब समस्त जिल्हावासियांना आनंद देऊन गेली. अनेक दिग्गज आणि वतनदार नेते काँग्रेसकडे असताना काँग्रेसने विचारधारेचा सच्चा पाईक असणाऱ्या आणि स्वच्छ चारित्र्याच्या माणसाचा सन्मान केला.. हर्षवर्धन सपकाळ आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झालेत. येत्या काळात हे नाव मेन स्ट्रिम मिडियात सातत्याने चर्चेत दिसणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे लक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे होमग्राउंड असणाऱ्या बुलडाण्याकडे देखील राहणार आहे. विशेषतः हर्षवर्धन सपकाळ यांची इज्जत वाढवण्याचे काम जिल्हा काँग्रेस कमिटीच्या हातात असणार आहे. काँग्रेसच्या वतीने होणारी आंदोलने, आगामी काळातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याकडे सर्वच माध्यमे प्रदेशाध्यक्षांचा जिल्हा म्हणून पाहणार आहेत. प्रदेशाध्यक्ष झाल्या झाल्या हर्षवर्धन सपकाळ यांनी ३ आणि ४ मार्चला राज्यव्यापी आंदोलन पुकारले. आज शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी जिल्हा केंद्रावर तर उद्या ४ मार्चला शहरी नागरिकांच्या समस्यांसाठी महानगरपालिका स्तरावर काँग्रेसच्या वतीने आंदोलने होणार आहेत. याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून बुलढाण्यात देखील शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी एल्गार मोर्चा काँग्रेसच्या वतीने करण्यात आला..मात्र या आंदोलनात ना कुठला जोश होता ना उत्साह... लोकसभा विधानसभा निवडणुकीतील पराभवाची मरगळ झटकण्यासाठी अजूनही जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते तयार नाहीत की काय? असा सवाल आज बुलढाण्यातील मोर्चाकडे पाहून अनेकांच्या मनात उपस्थित झाला.. प्रदेश काँग्रेसचा आदेश आला म्हणून औपचारिकता म्हणून आंदोलन पार पाडले की काय? अशीच कुजबुज उपस्थितांमध्ये सुरू होती..
तसे पाहिले तर बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेसची ताकद कमी नाही. अलीकडच्या काही वर्षांचा काळ सोडला तर ग्रामीण भागातील राजकारणावर काँग्रेसचेच वर्चस्व होते. आजघडीला देखील प्रत्येक गावात काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. चिखली, खामगाव, मलकापूर आणि जळगाव जामोद या ४ विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचेच उमेदवार होते. असे असताना जिल्हा काँग्रेसच्या वतीने आयोजित मोर्चात आज दिसलेली उपस्थिती नेत्यांसाठी चिंतेचा विषय बनली पाहिजे. खरेतर हर्षवर्धन सपकाळ यांनी ज्या मुद्द्यावर आंदोलनाची भूमिका घेतली ते मुद्देही व्यापक स्वरूपाचे आहेत. असे असताना ते मुद्दे लोकांपर्यंत पोहोचवणे ही जिल्हा काँग्रेसची जबाबदारी होती, मात्र त्यात ते कमी पडल्याचे दिसले. एल्गार मोर्चात शेतकरी बोटावर मोजण्याइतके आणि काँग्रेसचे पदाधिकारी अधिक असल्याने तो उत्साह आणि आक्रमकता दिसली नाही...एकंदरीत काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाने जिल्हा पातळीवर आयोजित केलेला आजचा एल्गार मोर्चा हा "फ्लॉप शो" च ठरला...