गावची मातीही लावली कपाळी! शिरपूरकर म्हणतात, जयश्रीताईच खेचणार विजयश्री....

 
  
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): कुठल्याही नेतृत्वाने आपलं कर्तृत्व गाजवून कितीही उंच भरारी घेतली तरी गावाच्या माती बद्दलची आपुलकी त्याच्या मनात कायम असते. नव्या लढाईला सामोरे जात असताना आपल्या माणसांची पाठीवर थाप आणि आशीर्वाद डोक्यावर असावा असं कुणाला वाटणार नाही. बुलडाणा विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्रीताई शेळके यांनी आज,२८ ऑक्टोबरला शिरपूर येथे जाऊन गावकऱ्यांची संवाद साधला. थोरांचे दर्शन घेत त्यांनी गावची माती आपल्या कपाळी लावली.
 शिरपूर ता. बुलडाणा येथील मन्नाथ महाराज महादेव, प. पु. शेषराव महाराज, भारतमाता, खंडोबा महाराज मंदीरात जाऊन दर्शन घेतले. तसेच स्वराज्यजननी मासाहेब जिजाऊ, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर या थोरमहापुरुषांच्या पुतळ्यास अभिवादन केले. आपली लेक विधानसभेच्या सभागृहात जावी यासाठी नियोजनात्मक प्रचारासाठी बुलडाणा विधानसभा मतदारसंघातही काम करण्याचा निर्धार गावकऱ्यांनी व्यक्त केला. जयश्रीताई विजयश्री खेचणारच असा विश्वास देखील शिरपूरकरांनी बोलून दाखवला आहे...