सरपंचपदाच्या आरक्षणाने अनेकांची राजकीय गणिते फसली; अनेकांचा स्वप्नभंग, तर काहींना मिळाली संधीची गोड बातमी.!
Jul 9, 2025, 16:06 IST
बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यातील ८७० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण तालुकास्तरावर काढण्यात आले. हे आरक्षण जाहीर हाेताच राजकीय हालचालींना गती मिळाली आहे.आरक्षणाच्या सोडतीत अनेक अनुभवी कार्यकर्त्यांचा अपेक्षाभंग झाला असून, काही नव्या चेहऱ्यांना संधीचे दार खुले झाले आहे. आरक्षण हे काहींसाठी स्वप्नभंग तर काहींसाठी राजकीय संधी ठरले आहे.
बुलढाण्यात ६६ पैकी ३४ गावांमध्ये महिला हाेणार सरपंच
बुलढाणा उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार विठ्ठल कुमरे यांच्या उपस्थितीत ६६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत पार पडली. यावेळी अनुसूचित जातीतील १२ पैकी ६ जागा, अनुसूचित जमातीतील ३ पैकी २ जागा आणि इतर मागास प्रवर्गातील १८ पैकी ९ जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. सर्वसाधारण ३३ पैकी १७ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत.
मोताळा तालुक्यात ३४ महिलांच्या हाती सत्ता
मोताळ्यात ६५ ग्रामपंचायतींपैकी ३४ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदे महिलांना मिळाली आहेत. जिल्हा पुनर्वसन अधिकारी शेलार व तहसीलदार हेमंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत पार पडली. यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी व सर्वसाधारण गटातील महिलांना संधी मिळाली.
