POLITICAL SPECIAL तर मैत्रीपूर्ण लढतीचेही सुर..! बुलडाणा आणि सिंदखेडराजात होऊ शकते मैत्रीपूर्ण लढत! इच्छुकांच्या पोटात गुदगुल्या...

 
बुलडाणा
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राजकारणात काहीच अशक्य नाही. कधी काय होईल, कधी भूमिका बदलल्या जाईल याचा नेम नाही. याचा अनुभव गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रातील राजकारणाने आणि त्यातल्या त्यात मतदारांनी चांगल्या प्रकारे घेतला आहे. महाविकास आघाडीची वाटचाल,सकाळचा शपथविधी त्यानंतर एकनाथ शिंदे यांचे बंड आणि अजित पवारांचे फडणवीसांसोबत पुन्हा संधान साधने यातून बऱ्याच गोष्टी पुढे आल्या. आता येणाऱ्या निवडणुकींना सामोरे जाताना जागा वाटपाची मोठी अडचण आहे. महायुतीमध्ये ज्या जागांवर वाद होऊ शकतो अशा ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचे सूर आगामी काळात आळवले जाऊ शकतात. तशा चर्चा देखील वरिष्ठ नेत्यांमध्ये सुरू असल्याचे समजते. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात देखील त्याचे पडसाद उमटू शकतात. मैत्रीपूर्ण लढतीच्या चर्चा सुरू झाल्यामुळे अनेक इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार अशा तीन सत्ता केंद्रांचा एकत्रित मिलाफ करून महायुती निवडणुकीला सामोरे जाण्याची चिन्हे आहेत. मात्र अजित पवार यांच्यावर शिंदे गटाकडून वारंवार होणारी टीका आणि दादांना महायुतीत घेण्यावरून दुखावलेले काही भाजपनिष्ट नाराज असल्याचे वास्तव यातून "ऑल इज नॉट वेल" हेच म्हणावं लागेल. त्यातच अमित शहा यांचा मुंबई दौरा आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भेटी नुकत्याच झाल्या.
अजित पवारांनी देखील अमित शहांची भेट घेतली. मुळात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिंदे शिवसेनेचे आमदार जिथून निवडून आलेले आहेत ते काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधात किंवा निवडून आलेले आहेत. जिथे सीटिंग आमदार तिथेच उमेदवारी असे सूत्र महायुतीत ठरले आहे. मात्र अजितदादा गटाकडून इच्छुकांची संख्या आणि २०१९ च्या निवडणुकीत भाजप सेने विरोधात उभ्या असलेल्या दादा समर्थकांची गोची होण्याची शक्यता वाढली आहे. एका बाजूला अजित पवार हे शहांसोबत झालेल्या बैठकीत जागा वाटपाचा मुद्दा चर्चिला गेला नसल्याचे सांगत असले तरी वेळेप्रसंगी मैत्रीपूर्ण लढतीचे सूर देखील राज्यात आळवले जाऊ शकतात. 
बुलडाण्यात काय?
गेल्या काही दिवसांपासून प्रत्येकच पक्षात इच्छुक उमेदवारांची संख्या वाढली आहे. त्यामुळे जो तो आपापल्या पक्षाची आणि आपली ताकद मतदारसंघात कशी जास्त आहे हे सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. अशा स्थितीत राज्यपातळीवर मैत्री कायम ठेवत काही मोजक्या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात. बुलडाणा जिल्ह्यापुरता विचार केला तर सिंदखेडराजा आणि बुलडाणा विधानसभा मतदारसंघात तशी शक्यता अधिक दिसते.
सिंदखेडराजात सध्या डॉ.राजेंद्र शिंगणे विद्यमान आमदार आहेत, आजघडीला ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या माध्यमातून महायुतीचा भाग आहेत, मात्र उद्या ते काय भूमिका घेतील हे सांगता येणार नाही. शिवाय त्यांच्यामुळे महायुतीत इच्छुक असलेल्या ढीगभर नेत्यांची गोची झालेली आहे. त्यात शिवसेनेकडून माजी आमदार शशिकांत खेडेकर, भाजपचे डॉ.सुनील कायंदे, विनोद वाघ ,डॉ.गणेश मांटे इच्छुकांच्या यादीत आहेत. शशिकांत खेडेकर यांनी तर काहीही झाले तरी लढणार अशी भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे मैत्रीपूर्ण लढतीचा पॅटर्न सिंदखेडराजात राबविला जाऊ शकतो. 
 दुसरीकडे बुलडाणा विधानसभा मतदारसंघात सध्या शिंदे यांच्या शिवसेनेचे संजय गायकवाड आमदार आहेत. मात्र भाजपच्या विजयराज शिंदेंची, योगेंद्र गोडेंची देखील लढण्याची तयारी सुरू आहे. भाजपचा एक गट तर संजय गायकवाड यांचे नावही घेऊ देत नाही. त्यामुळे राज्य पातळीवर युतीधर्म कायम ठेवत बुलडाण्यात मैत्रीपूर्ण लढतीची परवानगी भाजपकडून मागितल्या जाऊ शकते...