पोलीस सत्ताधाऱ्यांचे चमचे..! आमदार हर्षवर्धन सपकाळांकडून गंभीर आरोप; लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी पोलिसांची; पण.....

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा येथील जयस्तंभ चौकात आज चांगलाच राडा झाला. युवक काँग्रेसच्या वतीने संजय गायकवाड यांच्या निषेधाचे आंदोलन पूर्वनियोजित असताना आमदार संजय गायकवाड यांच्या समर्थकांनी आंदोलन होऊ देणार नसल्याची भूमिका घेतली. त्यासाठी संजय गायकवाड यांचे समर्थक जयस्तंभ चौकात मोठ्या संख्येने जमले. तणाव निर्माण होत असल्यामुळे अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी महामुनी यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी, दंगा काबू पथक आणि मोठा फौजफाटा जयस्तंभ चौकात तैनात करण्यात आला..
आमदार गायकवाड यांचे समर्थक आंदोलन होऊच देणार नाही या भूमिकेवर ठाम होते..अखेर पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांचे निषेध आंदोलन मोडीत काढून त्यांना ताब्यात घेतले. आमदार धीरज लिंगाडे, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले. 
Kayande
Advt.

काँग्रेसच्या वतीने गांधी भवनात सभेच्या ठिकाणी लावण्यात आलेले बॅनर देखील पोलिसांनी काढून टाकले.
या कारवाईमुळे संतप्त झालेल्या हर्षवर्धन सपकाळ यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. पोलीस सत्ताधाऱ्यांचे चमचे झाले आहेत. लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी पोलिसांची असते. मात्र पोलिसांकडून गुंडांना संरक्षण देण्याचा प्रयत्न सुरू आहे. आमच्यावर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी आ.गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करायला पाहिजे होती. बुलडाण्यात हुकूमशाही सुरू आहे. पोलीस सत्ताधाऱ्यांचे चमचे झाले आहेत असा घणाघात हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.