चिखलीत भाजप आणि काँग्रेसमध्येच मुख्य लढत! दलबदलू भूमिकेमुळे निलेश गावडेंना फटका बसणार?
Nov 26, 2025, 11:09 IST
चिखली(अक्षय थिगळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): "कारे...निलेश गावंडे साहेब कोणत्या पक्षात हाय रे बा? काहीच कळू नाही राहील..अरे आत्ता मागच्या आठवड्यात त ते राहुलभाऊ सोबत व्हते न.. आन दोनेक वर्षाआधी ते आमदार ताईंच्या पण गटात व्हते म्हणतेत.." चिखलीच्या खामगाव चौफुलीवर दोघांच्या अशा गप्पा चालू व्हत्या.. त्यातला एक म्हणे, अरे माणूस चांगला हाय लेका, पण दलबदलू हाय.. मले वाटते भाजपचे पंडितदादा आन् काँग्रेसच्या काशिनाथ आप्पातच खरी लढत होईल...
जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून ओळख असलेल्या चिखलीचे राजकारण नेहमीच पेटलेले असते..निवडणुकीच्या काळात तापमान कमालीचे वाढते, एवढी थंडी असली तरी चिखलीत गेल्यावर अंगावरील स्वेटर काढून टाकावे लागते म्हणतेत.. तर असो, मुद्दा असा आहे की..चिखलीत यावेळी दुरंगी लढत होईल असे चित्र आहे.. निलेश गावडेंना काँग्रेस उमेदवारी देईल असे वाटत होते,मात्र गावंडे यांच्या हातावर तुरी देऊन उमेदवारी मिळाली ती काशिनाथ आप्पा बोंद्रे यांना.. निलेश गावंडे टक्कर देऊ शकत नाहीत असं काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांना वाटल असेल कदाचित, किंवा दुसर तिसरं कारण असेल काहीतरी... गावंडे यांना का डावललं असेल ते राहुल बोंद्रेनाच माहीत.. पण चिखलीतले काही लोक म्हणतात की, गावंडे साहेब दलबदलू हायेत.. अगदी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सत्ताधाऱ्यांवर आरोपांच्या फैरी झाडणारे गावंडे दुपारी सत्तेचा भाग असलेल्या राष्ट्रवादीत गेले... एबी फॉर्म मिळवला अन् लगेच नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारीही दाखल केली..अर्थात चिखली शहरात फारसी ताकद नसलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला थोडा बरा उमेदवार मिळाला म्हणा.. आज डायरेक्ट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गावंडे यांच्या सभेला प्रचारासाठी येणार आहेत, पवारांच्या सभेनंतर गावंडे स्पर्धेत येतात का.. पाहावं लागेल...!!
