महायुतीवाल्यांनी महाराष्ट्र नासवून ठेवला! शिवसेना उपनेते शरद कोळी यांचे प्रतिपादन; राहुल बोंद्रेंच्या प्रचारार्थ म्हसला येथे पार पडली जाहीर सभा!
बुधवंत म्हणाले, शेतकऱ्यांच्या हितासाठी महाविकास आघाडीचे सरकार आणा...
Nov 15, 2024, 11:36 IST
चिखल(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महायुती सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. महिलांवरील अत्याचार वाढले. बेरोजगारी वाढली. महायुतीवाल्यांनी महाराष्ट्र नासवून ठेवला आहे असा आरोप करीत आता महायुतीला धडा शिकवण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आणा आणि राहुल बोंद्रे यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा असे आवाहन शिवसेनेचे उपनेते तथा धाडस या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद कोळी यांनी केले. महाविकास आघाडीचे चिखली विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार राहुल बोंद्रे यांच्या प्रचारार्थ म्हसला येथे जाहीर सभा पार पडली यावेळीला प्रमुख वक्ते म्हणून ते सभेला संबोधित करीत होते. यावेळी राहुल बोंद्रे यांच्यासह ,शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत, राष्ट्रवादीचे नेता ज्योतीताई खेडेकर यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलतांना शरद कोळी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राची आता महायुतीने पार दुर्दशा करून टाकली आहे. खतांचे औषधांचे भाव वाढले आहेत आणि शेतमालाचे भाव पडले आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत. या राज्यात कायदा सुव्यवस्था सुद्धा धोक्यात आलेली आहे. यावेळी कोळी यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर सुद्धा ताशेरे ओढले, उद्धव ठाकरेंच्या बॅगा चेक करता मग फडणवीस आणि अमित शहाच्याही बॅगा चेक करा असेही शरद कोळी म्हणाले. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी महाविकास आघाडी सरकार आले पाहिजे त्यासाठी चिखली विधानसभा मतदारसंघातून राहुल बोंद्रे यांना विजयी करा असे आवाहन शरद कोळी यांनी यावेळी केले..
शिवसेना राहुल बोंद्रेंच्या पाठीशी..
यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत म्हणाले की राज्यात अतिशय दयनीय अवस्था आहे. अडीच वर्षांपूर्वी खोके घेऊन गद्दारांचे सरकार अस्तित्वात आले. त्या सरकारने महाराष्ट्राची वाट लावल्याचे ते म्हणाले. राज्यात आता परिवर्तन अटळ आहे, चिखली विधानसभा मतदारसंघात शिवसेना राहुल बोंद्रे यांच्या पाठीशी ताकदीने उभी आहे असेही बुधवंत म्हणाले.