पत्रकारांच्या घराचा प्रश्न मार्गी लावणार! व्हाईस ऑफ मीडियाच्या जिल्हा बैठकीत आमदार संजय गायकवाड यांचा शब्द; जिल्ह्यातील ४०० पेक्षा अधिक पत्रकारांना मिळाले विम्याचे गिफ्ट...

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): व्हाईस ऑफ मीडियाचे काम अत्यंत उल्लेखनीय आहे. पत्रकारांसाठी ज्या पद्धतीने व्हाईस ऑफ मीडिया काम करत आहे ते कौतुकास्पद आहे. पत्रकार समाजातील वंचित घटकांच्या व्यथा प्रशासनासमोर मांडत असतो, पत्रकारांच्या जीवनात अनेक संकटे आणि अडचणी असतात, त्या मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. बुलढाण्यातील पत्रकारांच्या घराचा प्रश्न देखील लवकरच मार्गी लावणार असून त्या अनुषंगाने पुढच्याच आठवड्यात महत्त्वाची बैठक होणार आहे असे प्रतिपादन बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर संजूभाऊ गायकवाड यांनी केले. व्हाईस ऑफ मीडियाच्या नवीन जिल्हा कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा व आमदार संजय गायकवाड यांच्या पुढाकारातून जिल्हाभरातील पत्रकारांचा विमा पॉलिसी वितरण सोहळा आज बुलढाणा येथील जिल्हा पत्रकार भवनाच्या प्रांगणात पार पडला, यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी मंचावर व्हाईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, राज्य संघटक सुधीरजी चेके,राज्य कोअर कमिटी सदस्य अरुण जैन, सिद्धेश्वर पवार, विदर्भ संघटक सिद्धार्थ आराख, राज्य कार्यवाहक लक्ष्मीकांत बगाडे, विभागीय कार्याध्यक्ष अजय बिल्लारी उपस्थित होते..
कार्यक्रमाच्या आधी आमदार संजय गायकवाड यांच्या पुढाकारातून जिल्हाभरातील व्हाईस ऑफ मीडियाच्या ४०० पेक्षा अधिक सदस्यांचा विमा काढण्यात आला. पत्रकार हा सदैव रस्त्यावर असतो, त्यामुळे पत्रकार व पत्रकारांच्या कुटुंबीयांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. समाजाच्या हितासाठी झटणारा पत्रकार स्वतःकडे मात्र दुर्लक्ष करतो त्यामुळे पत्रकारांसाठी विमा कवच आवश्यक असल्याचे आ. संजय गायकवाड म्हणाले. व्हाईस ऑफ मीडियाने जिल्हाभरात अत्यंत चांगले काम केले आहे, संघटन बांधणी चांगली आहे असे गौरवोद्गारही आमदार संजय गायकवाड यांनी काढले. पत्रकारांच्या घरांसाठी व्हाईस ऑफ मीडियाची मागणी सातत्यपूर्ण आहे, पुढच्याच आठवड्यात या संदर्भात बैठक घेऊन पत्रकारांच्या घराचा प्रश्न मार्गी लावू असेही आमदार संजय गायकवाड म्हणाले. राज्य सरकारच्या वतीने पत्रकारांसाठी आर्थिक विकास महामंडळाची घोषणा केलेली आहे, महामंडळाला योग्य तो निधी मिळावा व महामंडळाच्या अध्यक्षस्थानी पत्रकाराची नियुक्ती व्हावी अशी मागणी देखील मुख्यमंत्र्याकडे केली असल्याचे आ. संजय गायकवाड म्हणाले...