उध्दव ठाकरेंच्या शिलेदारांच्या तोफा आज बुलडाण्यात धडाडणार! आक्रोश मोर्चासाठी अंबादास दानवे, खा.अरविंद सावंत येणार; मोर्चा रेकॉर्डब्रेक होणार! जालिंधर बुधवतांना विश्वास

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील १५१ गावांमध्ये  निघालेल्या मशाल यात्रेचा समारोप आज,२२ सप्टेंबरला बुलडाणा येथे  आक्रोश मोर्चाने होत आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांच्या नेतृत्वात निघालेल्या  मशाल यात्रेने मतदारसंघातील वातावरण ढवळून निघाले, आता या यात्रेचा अतिवराट समारोप आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून होत आहे. आज होणाऱ्या या मोर्चाची जय्यत तयारी करण्यात आली असून  शिवसेना पक्षप्रमुख उद्घव ठाकरेंचे धडाडीचे शिलेदार खा.अरविंद सावंत आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे या मोर्चाला उपस्थित राहणार आहेत. हा मोर्चा रेकॉर्डब्रेक होणार,हजारो शेतकरी या मोर्चात सहभागी होतील.शेतकऱ्यांचा आक्रोश शासनाच्या दरबारी पोहचवण्यासाठी हा मोर्चा असल्याचे बुधवंत यांनी म्हटले आहे.
सप्टेंबर पासून बुलडाणा विधानसभा मतदारसंघात मशाल यात्रा निघाली होती. मतदारसंघातील तब्बल १५१ गावांत ही यात्रा पोहचली. गावागावात कॉर्नर बैठका झाल्या.शेतकऱ्यांच्या ,कष्टकऱ्यांच्या अडचणी या मशाल यात्रेच्या माध्यमातून जालिंधर बुधवंत यांनी समजून घेतल्या. मशाल यात्रेला अभूतपूर्व असा प्रतिसाद मतदारसंघात सर्वत्र मिळाला आता  आज होणाऱ्या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून शेतकरी, कष्टकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यात येणार आहे.

 

असे आहे मोर्चाचे नियोजन...

शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांच्या टीमने अतिशय सूक्ष्म प्लॅनिंग आजच्या मोर्चाचे केले आहे. गावागावांत याआधीच मशाल यात्रेच्या माध्यमातून मोर्चाचे आवतन देण्यात आले आहे. त्यामुळे हजारो शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार तरुण, महिला या मोर्चात सहभागी होणार आहेत. जिजामाता प्रेक्षागार मैदानाजवळील टिळक नाट्य मंदिराच्या मैदानावरून सकाळी ११ वाजता या मोर्चाची सुरूवात होईल. त्यानंतर संगम चौक, जयस्तंभ चौक, बाजार गल्ली, कारंजा चौक मार्गे हा आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.या मोर्चाला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जालिंधर बुधवंत यांनी केले आहे.