भारताला आर्थिक महासत्ता बनविण्याच्या कार्याचा पाया डॉ. मनमोहनसिंह यांनी अर्थमंत्री व पंतप्रधान म्हणून रचला! केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांची भावपूर्ण श्रद्धांजली...
माजी पंतप्रधान स्वर्गीय मनमोहन सिंग यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवाचं दर्शन आज सकाळी शिवसेना नेते तथा केंद्रीय आयुष व आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रताप जाधव यांनी घेतलं या दुःखद प्रसंगी आपल्या शोक संवेदना व्यक्त करताना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की भारताला आर्थिक महासत्ता बनवण्याचा पाया डॉ. मनमोहनसिंह यांनी रचला. गेल्या अनेक दशकात आलेल्या प्रत्येक जागतिक मंदीसमोर भारताची अर्थव्यवस्था पाय घट्ट रोवून भक्कमपणे उभी राहिली, डॉ. मनमोहन सिंग यांनी १९९१ च्या आर्थिक संकटात आर्थिक उदारीकरण, जागतिकीकरण आणि खाजगीकरणाची धोरणे राबवून भारताच्या अर्थव्यवस्थेला मजबूत पाया दिला. अर्थमंत्री म्हणून त्यांनी परकीय चलनाचा साठा वाढवून आणि IMF कडून मदत घेऊन भारताला दिवाळखोरीपासून वाचवले.त्यांचा साधेपणा, नम्रता आणि राष्ट्राप्रती समर्पण सदैव आपल्या हृदयात राहील. त्यांचा वारसा आम्हाला प्रेरणा देत राहील.देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदीजी यांनी सुद्धा माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या संसदेतील व्यापक कार्याबद्दल प्रशंसा व्यक्त केली आहे. सन २००९ ते २०१४ या कालावधीत मला लोकसभा सदस्य या नात्याने त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली.त्यांच्या जाण्यानं देशावर शोककळा पसरली असून हे देशाचे कधीही भरून न येणारे नुकसान आहे.
या दु:खद क्षणी शिवसेना मुख्यनेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि मी त्यांच्या कुटुंबियांप्रती आणि प्रियजनांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो, देव त्यांना हे अपरिमित नुकसान सहन करण्याची शक्ती देवो. तसेच शिवसेना पक्षाच्यावतीने आणि केंद्रीय आयुष आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री या नात्याने मी श्रद्धाजंली अर्पण करीत आहे असे ना.प्रतापराव जाधव म्हणाले.डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाचं सभ्य, सुसंस्कृत, विश्वासार्ह नेतृत्वं हरपलं आहे. देश आपल्या सुपुत्राला मुकला आहे. देशाचे यशस्वी अर्थमंत्री, साहसी पंतप्रधान आणि जनमानसाचा विश्वास प्राप्त केलेला नेता म्हणून ते कायम स्मरणात राहतील असेही ना.प्रतापराव जाधव म्हणाले...