वनविभागाकडून सुरु असलेल्या अतिक्रमण हटाव कारवाईस स्थगिती द्यावी ;ॲड.जयश्री शेळके यांची मागणी
मोताळा तालुक्यातील संबंधित गावांमध्ये अनेक वर्षांपासून स्थानिक शेतकरी व ग्रामस्थ आपापल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी वनजमिनीवर शेती करत आहेत. या जमिनीवर त्यांनी स्वतःच्या कष्टाने सिंचनाची सोय, पिकांची लागवड व शेतीसाठी अन्य आवश्यक गोष्टी उभारलेल्या आहेत. अश्यावेळी वनविभागामार्फत अचानक अतिक्रमण हटाव कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, यामुळे त्यांच्या उपजीविकेवर मोठा आघात होणार आहे.
संबंधित शेतकरी ग्रामस्थ हे मागील २५-३० वर्षांपासून सदर जागेवर उपजीविका करतात. पेरणीच्या आणि पावसाळ्याच्या तोंडावर ही अतिक्रमण काढण्याची कारवाई होत असल्याने शेतकरी बांधवांमध्ये अत्यंत नाराजीचे व भीतीचे वातावरण आहे. तरी आपणास विनंती आहे की, वनविभागाच्या अतिक्रमण हटाव कारवाईस तात्काळ स्थगिती देऊन, गावकऱ्यांच्या भावना लक्षात घेता, सदर गावांतील संबंधित शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या जमीनी नियमित करण्यात याव्यात अशा मागणीचे निवेदन शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) प्रवक्ता ॲड.जयश्री शेळके यांच्यावतीने मा.पालकमंत्री यांना देण्यात आले आहे. यावेळी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, युवासेना जिल्हाप्रमुख नंदु कऱ्हाडे, तालुका प्रमुख लखन गाडेकर, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मो.सोफियान, युवासेना तालुकाप्रमुख व बिरसिंगपूर सरपंच संजय शिंदे, युवासेना शहरप्रमुख अनिकेत गवळी तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.