

प्रहारचे जिल्हा "पेटते" आंदोलन! आमदारांच्या निवासस्थानांसमोर टेंभे घेऊन जाणाऱ्या कार्यकर्त्यांना रोखले; चिखली, मलकापूर, खामगाव, जळगाव जामोद मध्ये आंदोलन!
Apr 12, 2025, 20:22 IST
बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) शेतकऱ्यांसह जनसामान्यांच्या विविध मागण्यांवर सरकार दरबारी आवाज उठविण्याकरिता सत्ताधारी आमदारांच्या घरांसमोर टेंभे घेऊन जाणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घरांजवळ जाण्यापासून आधीच रोखले. चिखली येथील आमदार श्वेताताई महाले यांचे घर काही अंतरावर असतानाच कार्यकर्त्यांना अडविण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख वैभवराजे मोहिते यांच्यासह पदाधिकारी व पोलिसांमध्ये 'शाब्दीक वॉर' झाला. जळगाव जामोद येथे कार्यकर्ते घरासमोर पोहोचले, पण पोलिसांनी त्यांचे आंदोलन चिरडले. खामगावातदेखील आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी कार्यकर्त्यांना घराघरांमधून हुडकून ताब्यात घेतले. पोलीस प्रशासनाने कितीही दंडेलशाही केली तरी बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली जनहितासाठी रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन छेडू, असा इशारा वैभवराजे मोहिते यांनी शासन व प्रशासनाला दिला आहे.
शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ करावे, पेरणी ते कापणीपर्यंतची कामे रोजगार हमी योजनेअंतर्गत करावी, दिव्यांगबांधवांना मासिक सहा हजार रुपये मानधन देण्यात यावे, शेतमालाला हमीभाव द्यावा, यासह विविध मागण्यांसाठी ११ एप्रिलच्या रात्री दहा ते बारा वाजेच्या सुमारास जिल्ह्यातील चिखली, मलकापूर, खामगाव व जळगाव जामोद येथील सत्ताधारी आमदारांच्या निवासस्थानांसमोर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने टेंभे आंदोलन पुकारण्यात आले होते. त्यानुसार आंदोलकांनी गळ्यात निळा दुपट्टा, एका हातात भगवा झेंडा आणि दुसऱ्या हातात टेंभा घेऊन आमदारांची घरे गाठण्याचा प्रयत्न केला. परंतु आधीच तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने आंदोलनात अडथळे आले. महायुती सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.
पोलीस प्रशासन आंदोलन चिरडण्याच्या तयारीत असल्याने जिल्हाप्रमुख वैभवराजे मोहिते यांनी गनिमीकावा करत आंदोलन यशस्वी केले. वैभवराजे मोहिते हे धाड येथून चिखलीकडे शंभरावर दुचाकींवर कार्यकर्त्यांसह टेंभे घेऊन निघाले. रात्रीची वेळ असल्याने रस्त्याने टेंभेच दिसून येत होते. आमदार श्वेताताई महाले यांच्या निवासस्थानाकडे जात असतानाच पोलिसांनी पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांना अलीकडचे अडविले.
लोकशाहीमार्गाने आंदोलन केले जाणार असल्यानंतरही पोलिसांनी बळाचा वापर केल्याने पोलीस आणि पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दीक चकमक झडली. अखेर आमदारांऐवजी आंदोलनस्थळी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनाच निवेदन देण्यात आले. तासभर आंदोलन झाल्यानंतर पोलिसांनी सर्वांना स्थानबद्ध केले. पहाटे चार वाजेपर्यंत चिखली पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले. नंतर सुटका करण्यात आली.
जिल्हाप्रमुख वैभवराजे मोहिते यांच्या नेतृत्वात चिखली तालुकाप्रमुख सुनील वाघ, बुलढाणा तालुकाप्रमुख गणेश काकडे, सोनू वाघ, अनंत उबाळे, विष्णू घाडगे, सचिन नेमाने, अरविंद गुजर, पिंटू गुजर, गणेश जाधव, अजय शिंदे, विकी सरोदे, नीलश चिंचोले, पवन बामदळे, आकाश जाधव, दिलीप उबाळे, स्वप्निल नेमाने, नितिन इंगळे, सुनील शिंदे, राजू ढोले, आशिष तोटे, विशाल मोरे, नितिन पवार, गौरव चव्हाण, अतुल अवसरमोल, राजू भिंगारे, आकाश कदम, तन्वीर बेग, पवन पवार, शिवराज बोराडे, अमोल माळोदे, अर्जुन भालेराव, शुभम मोहिते, श्रीकांत गुजर, सागर पैठणे, वैभव सोनुने, आदित्य भिंगारे, संजय रत्नपारखी, गोपाल गायकवाड, मोहन निकम, अभिषेक पवार, वैभव माळोदे, राहुल येंडोले, आकाश टाकसाळ, ऋषीकेश बोराडे, बबन ठाकरे, सुनील उगले, विकास उगले, सागर बावस्कर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.
मलकापूर येथे रात्री नऊच्या सुमारास आमदार चैनसुख संचेती यांच्या निवासस्थानासमोर टेंभे आंदोलन करण्यात आले. निवेदन स्वीकारण्यासाठी आमदार संचेती स्वत: घराबाहेर आले. उपजिल्हाप्रमुख अजय टप, तालुकाध्यक्ष अजित फुंदे, शहरप्रमुख शालीग्राम पाटील, उपशहरप्रमुख बळीराम बावस्कर, कैलास मानकर, राहुल तायडे, उमेश जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.
संग्रामपूर येथे शंकर पुरोहित, हरिभाऊ तायडे, संतोष वानखेडे, शेख याकूब, विजय वानखेडे, सिद्धार्थ सोनुने, अतुल वानखेडे, अनंता वानखेडे, शेख साबीर शेख अयूब, अशोक सावतकार, राहुल भातेकर हे कार्यकर्ते जळगाव जामोद येथे आमदारांच्या घरासमोर आंदोलन करण्यासाठी निघाले असतानाच त्यांना तामगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतच आधीच सापळा रचून असलेल्या पोलिसांनी पकडले. स्थानबद्ध केल्यानंतर रात्रभर पोलीस ठाण्यात बसून ठेवण्यात आले.
आंदोलनाची पोलिसांना धास्ती
आमदार बच्चू कडू आणि अनोखे आंदोलन असे समीकरण असल्याने पोलीस यंत्रणेने टेंभे आंदोलनाची चांगलीच धास्ती घेतल्याचे दिसून आले. चारही ठिकाणच्या आंदोलनादरम्यान आधीच तगडा बंदोबस्त तैनात केला होता. हटके स्टाइल आंदोलनासाठी परिचित असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाने टेंभे आंदोलन करून पोलीस यंत्रणेला चांगलाच घाम फोडला.
घरोघरी जावून उचलले कार्यकर्ते
खामगाव येथे गजानन लोखंडकार, पंकज बोराडे, योगेश बावने, दिनकर खंडारे, अरुण राऊत, अकाश उगले, गोविंदा कांडेलकर, सागर फुंडकर, रवींद्र पारखे, रोशन देशमुख, मुकुंदा कडाळे, आकाश वसोकार, गोलू कडाळे, गोलू राऊत हे आमदार आकाश फुंडकर यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यासाठी टेंभे घेऊन निघणार होते. मात्र, पोलिसांनी हे आंदोलन दडपले. या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घरोघरी जावून ताब्यात घेतले.