लावलेला खर्चही निघाला नाही; कर्ज कसे फेडू? शेतकऱ्यासमोर प्रश्न "आ" वासून उभा राहिला! अखेर टोकाचा निर्णय घेतला; मोताळा तालुक्यातील पुन्हई ची घटना...
पुन्हई येथील उखर्डा सुपडा शिंदे यांच्या आईच्या नावावर गट क्रमांक ६७ मध्ये ३ एकर शेती आहे. त्यांचा उदरनिर्वाह शेतीवरच चालतो. त्यांनी बुलढाणा जिल्हा केद्रींय बँकेचे ५० हजार रुपये कर्ज घेतले होते. यावर्षीची दुष्काळग्रस्त परिस्थीतीमुळे शेतीला लावलेला खर्चही निघाला नसल्याने ते मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले होते. बँकेचे कर्ज कसे फेडावे?, कुटुंबीयांचा उदरनिर्वाह कसा करावा?, या विवंचनेत उखर्डा शिंदे सापडल्याने त्यांनी पुन्हई पोलीस पाटील यांच्या घराच्या पाठीमागे असलेल्या सुबाभळीच्या झाडाला २६ डिसेंबरच्या रात्री गळफास घेवून आत्महत्या केल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. याप्रकरणी त्यांचे चुलतबंधू तुकाराम दगडू शिंदे यांच्या फिर्यादीवरुन बोराखेडी पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, १ मुलगी असा आप्त परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने शिंदे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.