काँग्रेसचा प्लॅन ठरला..! साडेतीन हजार शेतकऱ्यांच्या अन्...आज बुलडाण्यात मुख्यमंत्र्यांना देणार....

 

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज बुलडाणा दौऱ्यावर येत आहेत. ऐतिहासिक आणि अतिशय भव्यदिव्य अशा शिवस्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यासह २१ महापुरुषांच्या स्मारकांचे लोकार्पण आज होत आहे. याशिवाय लाडकी बहीण योजनेच्या प्रचार प्रसाराचा शासकीय कार्यक्रम देखील होणार आहे. दोन दिवसांआधी आ.संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांची जीभ छाटण्याचे वक्तव्य केले होते, तेव्हापासून महाविकास आघाडी आ.गायकवाड यांच्या विरोधात प्रचंड आक्रमक झाली होती. दरम्यान काल,आमदार गायकवाड यांनी एक पाऊल मागे घेत ते वक्तव्य आमदार म्हणून नव्हे तर देशभक्त नागरिक म्हणून केल्याचे विधान केले होते. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी काँग्रेसने वेळ मागितली असल्याची सूत्रांची माहिती आहे..काँग्रेस एक निवेदन मुख्यमंत्र्यांना देणार आहे, हे निवेदन शेतकऱ्यांच्या रक्ताने लिहिलेले आहे.

Gaykwad
Advt 
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. अद्याप प्रशासनाने त्यांना भेटीची वेळ दिलेली नाही.शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भातील निवेदन त्यांना मुख्यमंत्र्यांना द्यायचे आहे. विशेष म्हणजे जे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे ते शेतकऱ्यांच्या रक्ताने लिहिलेले आहे. साडेतीन हजार शेतकऱ्यांच्या सह्या या निवेदनावर आहेत, काही शेतकऱ्यांनी स्वतःच्या रक्ताने सह्या केल्या आहेत. काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनीदेखील स्वतःच्या रक्ताने निवेदनावर सही केली आहे...
Jadhav
Advt 
सोयाबीन कापसाला भाव मिळावा, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, थकलेला पिक विमा मिळावा, उशिरा पिक विमा देणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी, शेती कामासाठी दिवसा वीजपुरवठा व्हावा यासह इतर मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे.