सिंदखेडराजा मतदारसंघात निष्ठेची धगधगती मशाल! उद्या, १० गावांत होणार मशाल यात्रेचा जागर! दिलीप वाघ म्हणाले, ताकद दाखवून देऊ....
Updated: Sep 18, 2024, 08:46 IST
सिंदखेडराजा(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप वाघ यांच्या नेतृत्वात सिंदखेडराजा मतदारसंघात निघालेली मशाल यात्रा चांगलीच गाजत आहे. १५ सप्टेंबरला वरुडी येथून मोठ्या दिमाखात या मशाल यात्रेचा प्रारंभ झाला. गावागावात या यात्रेला मिळणारा प्रतिसाद प्रचंड असाच आहे. दिलीप वाघ यांच्या टीमचे नियोजन, महायुती सरकारविरोधातील आक्रमतेची धार यामुळे मशाल मतदारसंघात धगधगत आहे. उद्या,१८ सप्टेंबरला १० गावांत ही यात्रा पोहचणार आहे.
सकाळी ८ वाजता दुसरबीड येथून प्रारंभ झाल्यानंतर दुपारी १२ वाजता केशवशिवणी,१२.३० वाजता तढेगांव, १ वाजता बारलिंगा, २ वाजता खैरव, २.३० वाजता वाकद, ३ वाजता डोरव्ही, ४.३० वाजता पोफळशिवणी, ५.३० वाजता वाघाळा आणि ६.३० वाजता मलकापूर पांग्रा असा मशाल यात्रेचा उद्याचा प्रवास राहणार आहे. "मशाल यात्रेच्या माध्यमातून आम्ही गावोगावी निष्ठेचा जागर करीत आहोत,शेतकरी शेतमजुरांच्या प्रश्नांवर आम्ही २५ सप्टेंबरला सिंदखेडराजा तहसील कार्यालयावर मोर्चा काढणार आहोत.या मोर्चात आम्ही शिवसेनेची ताकद काय असते हे दाखवून देऊ. या मतदारसंघात जनता गद्दारांना पळती भुई थोडी केल्याशिवाय राहणार नाही असे माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप वाघ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.