सरकारी योजनेसाठी पैसे मागणाऱ्या दलालांना "बुलडोझर पॅटर्न" ने धडा शिकवणार ! आ. श्वेताताईंचा इशारा...

 
 चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत चिखली तालुका व चिखली विधानसभा मतदारसंघांमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात घरकुले मंजूर झालेले आहेत. या घरकुलांची प्रथम हप्ता वितरण व मंजुरी पत्रे यांचे वाटप करण्यात आलेले आहे. परंतु या घरकुलाच्या नियमानुसार प्रक्रिया पार पडत असताना बऱ्याच गावांमधून मध्यस्थ किंवा दलाल आणि काही एजंट सक्रिय झालेले आहेत. हे मध्यस्थ किंवा एजंट लाभार्थ्याकडून काही पैशाची मागणी करतात आणि त्या बदल्यात त्यांचे काम लवकर करून देण्याचे आश्वासन देतात किंवा आपणच ते काम करून देऊ शकतो असा आभास निर्माण करतात. सर्वसाधारणपणे हाच पॅटर्न वापरून गावागावातून गुरांचे गोठे मंजूर करणे, शेळ्यांचे गोठे मंजूर करणे, रोजगार हमीमध्ये नाव नोंदणी करून मस्टर मंजूर करून घेणे, सरकारी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या विहिरी मंजूर करून घेणे, बांधकाम कामगारांच्या मुलांचे वेगवेगळे क्लेम काढून देणे यासाठी काही शासकीय सेवक, काही कंत्राटी शासकीय सेवक व काही कंत्राटदार व काही दलाल यांनी साखळी निर्माण केली आहे.भारत सरकार, महाराष्ट्र सरकार व जिल्हा परिषद, पंचायत समिती, पासून ते ग्रामपंचायत पर्यंत ज्या काही शासकीय योजना येतात या योजना सर्वसामान्य भारतीय नागरिकांचा हक्क आहेत. या योजना व प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत व घरकुलाच्या कोणत्याही योजनेअंतर्गत ग्राम सभेने मंजूर केलेली घरकुलाची यादी आणि काम हे सरकारी नियमानुसारच कोणतेही मध्यस्थ व एजंट याचा सहारा न घेता व कुणालाही लाच स्वरूपात किंवा दलाली स्वरूपात पैसे न देता करून घ्यावे असे आवाहन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांनी केले आहे. गावातील व पंचायत समिती किंवा तहसील मधील कुणी दलाल तुमच्याकडे येऊन तुमची काम लवकर करून देतो म्हणून पैसे मागत असेल तर अशा लोकांची तक्रार पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी गजानन पोफळे यांच्याकडे करण्यात यावी किंवा आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या कार्यालयाशी सरळ संपर्क साधून पैसे मागणारा सरकारी किंवा खाजगी व्यक्ती असेल त्याची तक्रार करावी असे आवाहन देखील आ .महाले यांनी केले आहे.

 
 सर्वसामान्य भारतीय जनतेच्या आणि माझ्या चिखली विधानसभा मतदारसंघातील माझ्या बंधू-भगिनींच्या कामासाठी जर कोणी शासकीय सेवक व खाजगी दलाल पैसे मागत असेल तर त्याची फोन द्वारे व लेखी रीतसर तक्रार कार्यालयाला कळवा अशा शासकीय सेवकाला वा खाजगी दलालाला "देवा भाऊच्या सरकारकडून बुलडोझर पॅटर्नने उत्तर दिले जाईल व चांगला धडा शिकवला जाईल" असे आमदार श्वेताताई महाले पाटील म्हणाल्या.