महायुती सत्तेत असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही! आ. संजय रायमुलकरांचा लाडक्या बहिणींना शब्द; विरोधकांच्या भुलथापांना बळी न पडण्याचे आवाहन...

 
 
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आतापर्यंत काँग्रेसने लाडक्या बहिणीसाठी काहीच केले नाही.. महाविकास आघाडीचाही केवळ मतांवर डोळा आहे, त्यामुळे लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याच्या अफवा ते पसरवत आहेत. खरेतर पराभवाची भीती असल्याने पराभूत मानसिकतेतूनच ते खोटे नाटे आरोप करीत व अफवा पसरवत सुटले आहेत. जोपर्यंत महायुती सरकार सत्तेत आहे तोपर्यंत जनहिताची एकही योजना बंद होणार नाही..लाडकी बहिण योजना बंद होणार नाही..उलट लाडक्या बहीण योजनेत निधी कसा वाढवता येईल याचा विचार महायुती सरकार करेल..त्यामुळे तुम्ही निश्चिंत रहा आणि महायुतीचे हात बळकट करा असे आवाहन मेहकर - लोणार विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार डॉ.संजय रायमुलकर यांनी केले.काल,३ नोव्हेंबरला प्रचार दौऱ्यादरम्यान नायगाव दत्तापुर, शेंदला येथे महिलांशी संवाद साधतांना आ. रायमुलकर बोलत होते..यावेळी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 पुढे बोलतांना आ.डॉ.संजय रायमुलकर म्हणाले की, मुख्यमंत्री कसा असावा हे महाराष्ट्राने गेल्या अडीच वर्षात अनुभवले. २४ तास ऑन ड्युटी असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जनहिताची प्रचंड तळमळ आहे. त्यामुळे काम आणि फक्त काम हेच एकमेव व्रत शिंदेसाहेबांचे आहे. अडीच वर्षांत जेवढे निर्णय झाले तेवढे याआधी कधीच झाले नव्हते. महायुती सरकार हे देणारे सरकार आहे तर महाविकास आघाडीने आतापर्यंत केवळ लोकांना लुबाडण्याचे काम केले आहे.त्यामुळे महाविकास आघाडी आणि विरोधकांच्या अफवांना बळी पडू नका असे आ. रायमुलकर म्हणाले. पीएम किसान, नमो किसान महासन्मान योजना, लखपती दीदी, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना या योजनांच्या माध्यमातून महिला आणि शेतकऱ्यांच्या कल्याणाचे काम मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने केले असल्याचेही आ. रायमुलकर यावेळी म्हणाले...