विधानसभेच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज! उद्या, सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरूवात, प्रत्येक विधानसभेसाठी १४ टेबल;पोलीसांचा चोख बंदोबस्त;
११५ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला; कोणत्या मतदारसंघात किती फेऱ्या..वाचा...
Updated: Nov 22, 2024, 13:05 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर, बुलढाणा, चिखली, सिंदखेड राजा, मेहकर, खामगांव व जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान झाले असून मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून प्रचंड पोलीस बंदोबस्तात होणाऱ्या मतमोजणीतून सात विधानसभेच्या 115 उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्रासाठी 14 टेबल असणार आहे.
मतमोजणी ठिकाण याप्रमाणे..
21-मलकापूर विधानसभा येथील मतमोजणी कृषी उत्पन्न बाजार समिती, बेलाड यार्ड मलकापूर, 22-बुलढाणा विधानसभा येथील मतमोजणी निवडणूक विभाग इमारत, तहसिल चौक मागे बुलढाणा, 23-चिखली विधानसभा येथील मतमोजणी तालुका क्रिडा संकुल बॅडमिंटन हॉल चिखली, 24-सिंदखेडा राज विधानसभा येथील मतमोजणी महाराष्ट्र राज्य वखार सहकार गोदाम, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर सिंदखेड राजा, 25-मेहकर विधानसभा येथील मतमोजणी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ गोदाम क्रमांक 5 मेहकर, 26-खामगांव विधानसभा येथील मतमोजणी सरस्वती विद्या मंदिर हॉल खामगाव, 27- जळगाव जामोद विधानसभा येथील मतमोजणी नवीन प्रशासकीय इमारत जळगाव जामोद येथे होणार आहे.
मतमोजणीच्या फेऱ्या याप्रमाणे :
विधानसभेच्या मतमोजणीस त्या-त्या ठिकाणी सकाळी 8 वाजता सुरुवात होणार असून मतदारांच्या संख्येनुसार फे-या होणार आहेत. यात मलकापूर 22 फेऱ्या , बुलढाणा फेऱ्या 24, चिखली 23 फेऱ्या, सिंदखेड राजा 25 फेऱ्या, मेहकर 25 फेऱ्या, खामगांव 23 फेऱ्या व जळगाव जामोद 23 फेऱ्या होतील. प्रथम टपाली मतदानाची मतमोजणी होईल व त्यानंतर ईव्हीएम मतमोजणीस सुरुवात होईल. मतमोजणीसाठी सातही विधानसभा मतदारसंघात प्रत्येक टेबलवर प्रत्येकी एक कोतवाल, मतमोजणी अधिकारी, पर्यवेक्षक व सूक्ष्म निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
मतदानाची विधानसभा मतदारसंघनिहाय अंतिम टक्केवारी याप्रमाणे :
मलकापूर विधानसभा मतदारसंघात 71.17, बुलढाणा विधानसभा मतदारसंघात 62.39, चिखली विधानसभा मतदारसंघात 72.07, सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात 70.22, मेहकर विधानसभा मतदारसंघात 68.97, खामगांव विधानसभा मतदारसंघात 76.06, जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात 73.54 असे एकूण 70.60 टक्के अंतिम सरासरी मतदान झाले. 21 लक्ष 34 हजार 500 मतदारापैकी 15 लक्ष 6 हजार 925 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 7 लक्ष 91 हजार 87 पुरुष, 7 लक्ष 15 हजार 822 महिला तर 16 तृतीयपंथीय मतदरांनी मतदान केले.