EXCLUSIVE जिल्ह्यातील ५१४ गावांमधील पोलीस पाटील भरतीला स्थगिती! आरक्षणही निघाले नाही; वाचा कारण काय...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा जिल्ह्यातील ५१४ गावांमध्ये पोलीस पाटील पदासाठी भरती होणार होती. त्यासाठीचा कार्यक्रम देखील जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार १५ मार्चला गावानुसार आरक्षण जाहीर होणार होते तर लेखी परीक्षेनंतर २५ एप्रिलला पोलीस पाटलांच्या नियुक्ती जाहीर करण्यात येणार होत्या. मात्र आता पोलीस पाटील भरती पदाचा हा कार्यक्रम तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. आरक्षण निश्चिती कशी करायची यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे मार्गदर्शन मागितले आहे. ते मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतरच आता ही प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचे बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ सूत्रांनी "बुलडाणा लाइव्ह" शी बोलतांना सांगितले..
  
  बुलढाणा जिल्ह्यातील ६ उपविभागातील ५१४ गावातील पोलीस पाटील भरतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. १५ मार्चला गावनिहाय आरक्षण निश्चित होणार होते,मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावर असलेल्या काही त्रुटीसंदर्भात उपविभागीय अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मार्गदर्शन मागितले होते. आता जिल्हा प्रशासनाने देखील राज्य शासनाकडे त्यासंदर्भात मार्गदर्शन मागितले आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून त्यावर उत्तर येईपर्यंत पोलीस पाटील भरतीला स्थगिती देण्यात आली आहे.