रोखठोक..! कार्यकर्त्यांनो तुम्ही सतरंज्याच उचला! कार्यकर्त्यांच्या निवडणुका किंवा भाषणात सांगण्यासाठी; निवडणुका लढवायला आहेत की नेत्यांचे कुटुंबीय.! तुमच्याकडे पैसा कुठे आहे लढायला?

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): "आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत.. आमच्या निवडणुकांमध्ये तुम्ही आमच्यासाठी जिवाचे रान केले ..आता तुमच्या निवडणुकांमध्ये आम्ही स्वस्थ बसणार नाही... तुम्हाला निवडून आणल्याशिवाय आम्ही थांबणार नाही.." अशा पद्धतीची भाषणे नेत्यांच्या तोंडून तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वी ऐकली असतील.. नेत्यांच्या अशा भाषणामुळे कार्यकर्त्यांना हुरूप चढला होता... विधानसभा लोकसभा, निवडणुकीत आपण केलेल्या कामाची पावती मिळेल असे कार्यकर्त्यांना वाटू लागले होते. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी सुद्धा त्यांनी जोरात तयारी सुरू केली होती... पण काल दुपारनंतर अनेक कार्यकर्त्यांची चेहरे पडलेले... ज्या नेत्यांसाठी आपण कंबर कसली, घरादारावर तुळशीपत्र ठेवलं, त्याच नेत्यांनी आपला गेम केल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये दाटून आली होती..काही कार्यकर्ते अक्षरशः ढसाढसा रडले, मात्र त्यांचे अश्रू कोण पुसणार? कारण, नेते आता त्यांच्या कुटुंबीयांसाठी समीकरण जुळवण्यात व्यस्त होते... होय.. हीच परिस्थिती काल दिवसभर केवळ जिल्ह्यात नव्हे तर सगळीकडेच होती..

खरेतर एका पक्षात एका उमेदवारीसाठी अधिक कार्यकर्ते दावेदार असणे हे त्या पक्षाच्या लोकप्रियतेचे लक्षण आहे..मात्र सामान्य कार्यकर्ता सोडून जेव्हा नेता स्वतःच्या मुलाला, कुटुंबातील इतर सदस्यांनाच त्या उमेदवारीसाठी योग्य समजतो तेव्हा कार्यकर्ते दुखावणार नाहीत का? काही मोजके अपवाद वगळले तर बुलडाणा जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात बहुतांश ठिकाणी घराणेशाहीलाच प्राधान्य दिल्याचे चित्र समोर आले. हे चित्र काही लोकशाहीसाठी समाधानकारक नाही. लोकशाही "शाही" लोकांच्या हातात जाते की काय? अशी भीती आता निर्माण होऊ लागली आहे. निवडणुका लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी केवळ पैसाच लागतो असे नेते कार्यकर्त्यांना सांगतात.. "तुझ्याकडे आहेत का रे बाबा तेवढे पैसे?" असे विचारतात.. मग तुझ्याकडे पैसे नसल्याने उमेदवारी देऊ शकत नाही असे थेट सांगून मोकळे होतात...

बिचारा कार्यकर्ता घरदार सोडून नेत्यांसाठीच झटत असतो, त्याला पैसे कमवायला वेळ कुठे असतो? कार्यकर्ता ठेकेदार नसतो अन् ठेकेदार असतो तो कार्यकर्ता नसतो हे नेत्यांना कळतच नाही म्हणून कार्यकर्त्यांचे वांधे होतात... असो, काही दिवस कार्यकर्ते ढसाढसा रडतील, मग नेता पाठीवरून हात फिरवेल, पुढच्या वेळेस तुझा विचार करू असे "चॉकलेट" देण्यात येईल अन् आपला कार्यकर्ता पुन्हा सतरंजा उचलायला मोकळा होईल... चला तर मग कार्यकर्त्यांनो, उचला सतरंजा.....