चिखलीत महायुतीत फूट, महाविकास आघाडीची एकजूट ! भाजपकडून पंडितराव देशमुख! काँग्रेसकडून काशिनाथ आप्पा बोंद्रे;
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शिंदेंच्या शिवसेनेसोबत जमले; निलेश गावडेंना दिली उमेदवारी....
Nov 17, 2025, 19:38 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेवटच्या दिवसापर्यंत चिखली नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची उमेदवारी कुणाच्या गळ्यात? याबाबत उत्सुकता ताणली गेली होती..अखेर आता उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर चिखलीतील चित्र क्लिअर झाले आहे..अर्थात अद्याप उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस बाकी आहे...मात्र एकंदरीत आज–घडीला चिखली नगरपरिषदेत तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. चिखलीत महायुतीत मोठी फूट निर्माण झाली. महायुतीचे घटक पक्ष असलेल्या तिन्ही प्रमुख पक्षांपैकी भाजपने स्वतंत्र व अजित पवारांच्या राष्ट्रवादी व शिंदे यांच्या शिवसेनेने युती करून वेगळा उमेदवार दिला आहे. मात्र महाविकास आघाडी कडून एकमेव उमेदवार रिंगणात आहे.. भाजपकडून पंडितराव देशमुख, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी युतीकडून प्रा.निलेश गावंडे आणि काँग्रेसकडून काशिनाथ आप्पा बोंद्रे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. शेवटच्या टप्प्यात काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष किशोर कदम यांनी बहुजन समाज पार्टी कडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
भाजपकडून उमेदवारीचा मुद्दा शेवटच्या दिवसांपर्यंत चर्चेला गेला. डॉ.संध्या कोठारी आणि पंडितराव देशमुख यांच्यापैकी कुणाला उमेदवारी? याबाबत चौका चौकात गप्पा रंगल्या होत्या. अखेर शेवटच्या क्षणी पंडितराव देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. दुसरीकडे काँग्रेसकडून निलेश गावंडे इच्छुक होते, मात्र उमेदवारी कटल्यानंतर अखेरच्या काही तासात ते सत्ताधारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेले आणि उमेदवारी देखील मिळवली. शिवसेनेच्या विलास घोलप यांनी दोन दिवसाआधीच नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दाखल केली होती, मात्र अखेरची क्षणी शिंदे यांच्या शिवसेनेची अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती झाली..
प्रा.निलेश गावंडे यांचा उमेदवारी अर्ज भरतेवेळी विलास घोलप देखील उपस्थित असल्याने घोलप आता माघार घेतील हे जवळपास स्पष्ट आहे.
काँग्रेसने बोंद्रे कुटुंबातील काशिनाथ आप्पा बोंद्रे यांची उमेदवारी फायनल केली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने मात्र चिखलीत उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे आज घडीला महायुतीत फूट तर महाविकास आघाडीची एकजूट असे चित्र निर्माण झाले आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर यांनी देखील चिखलीत महाविकास आघाडी म्हणून आम्ही काँग्रेसच्या उमेदवारासोबत असल्याचे "बुलडाणा लाइव्ह" शी बोलतांना सांगितले..
