SPECIAL मनाला भावनारा विजय..! सिंदखेडराजात मनोज कायंदे यांना मानलच पाहिजे..! सर्व काही संपलं असं वाटत असताना "तो" लढला अन् जिंकलाही...

  
 
बुलडाणा(कृष्णा सपकाळ: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महिनाभरापूर्वीच वडिलांचं निधन झालेलं..त्याआधी वडिलांच्या आजारपणामुळे मतदार संघाशी संपर्क तुटलेला...सिंदखेड राजाची जागा काँग्रेसला सुटण्याची शक्यता कमीच,त्यामुळे निवडणूक लढण्याच्या स्पर्धेत कुठेही नसतांना अचानक घडलेल्या घडामोडींमुळे उमेदवारीची माळ गळ्यात पडते..एवढे घडून येऊनही त्यांच्या उमेदवारीवरच संशय घेतल्या जातो..डॉ.राजेंद्र शिंगणे यांनीच मनोज कायंदे यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी ॲड. नाझेर काझी यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीत ठेवले असावे असा संशय विरोधकांकडून उपस्थित केल्या जातो..अशा चहूबाजूंनी प्रतिकूल असलेल्या परिस्थितीत मनोज कायंदे हा तरुण केवळ विकासाचे व्हिजन समोर ठेवून लढतो.. ना कुणावर टीकाटिप्पणी ना आक्रमक भाषणबाजी... प्रचाराच्या शेवटच्या दिवशी तर हद्दच होते, अजित पवारांच्या राष्ट्रवादीने डॉ. शशिकांत खेडेकर यांना पाठिंबा दिल्याचे पत्र व्हायरल होते..आता सर्वकाही संपले, असे वाटत असतानाच ज्या सोशल मीडियावर हे पत्र व्हायरल झाले होते त्याच सोशल मीडियाचा प्रभावी वापर करीत तो हल्ला ताकदीने परतवून लावल्या जातो...आणि अखेरच्या दोन दिवसांत मनोज कायंदे यांच्या बाजूने एक लाटच तयार होते...आणि त्याची अंतिम परिणीती डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्यासारख्या मुरब्बी राजकारण्याला पराभूत करीत विजयी पताका फडकवण्यात होते... व्वा...! मनोज कायंदे यांच्या या लढाईला सॅल्युटच केला पाहिजे...या लढाईला मानलंच पाहिजे...
खरेतर उमेदवारी अर्ज भरला त्या दिवशी मनोज कायंदे यांच्यासाठी फारशी अनुकूल परिस्थिती नव्हती. सकाळी एबी फॉर्म मिळाल्याची बातमी धडकली, त्यामुळे शक्ती प्रदर्शन करायलाही फारसा वेळ मिळाला नाही. भाजपची भूमिका या निवडणुकीत शेवटपर्यंत तटस्थच पहायला मिळाली.. ज्यांनी काम करायचे ते आतूनच केले, उघडणे कुणीही भाजपचा नेता मैदानात उतरताना दिसला नाही(कदाचित राजकीय अस्तित्वाच्या भीतीपोटी)..त्यामुळे भाजपचे मतदाराही शेवटपर्यंत संभ्रमातच होते.. भाजपच्या मतांचे विभाजन झालेच..मात्र एवढे होऊनही जो विजय मनोज कायंदे यांनी साकारला त्याला तोड नाही. अर्थात मनोज कायंदे यांच्या विजयात सामाजिक पाठबळही मोलाचे ठरले. सुरुवातीला १० हजार मतांनी पिछाडीवर असलेल्या मनोज कायंदे यांनी शेवटच्या काही फेऱ्यात दमदार मते घेत डॉ.खेडेकर आणि डॉ.शिंगणे या दोघांनाही धोबीपछाड दिली. आता नव्या दमाचे मनोज कायंदे सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाले आहेत, राज्यात महायुतीची सत्ता देखील आली आहे.
त्यामुळे कायंदे यांना जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवून दाखवावा लागणार आहे.. टीकाटिप्पणी न करता सुद्धा आमदार होता येऊ शकते हे मनोज कायंदे यांच्यासारख्या नव्या दमाच्या तरुण नेतृत्वाने दाखवून दिले आहे.. एकंदरीत बुलढाणा जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांपैकी अनेकांच्या मनाला भावनारा निकाल ठरला तो सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील आमदार मनोज कायंदे यांचाच...