म्हणून तेली समाज बांधव आमदार संजय रायमुलकर यांच्याच पाठीशी! ॲड. गजानन क्षीरसागर यांची ग्वाही! तेली समाज बांधवांचा दिवाळी स्नेहमिलन सोहळा संपन्न..
Nov 4, 2024, 20:26 IST
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): तेली समाज घटकांना आमदार संजय रायमुलकर यांनी गतकाळात सातत्याने सहकार्य केलेले आहे. सार्वजनिक हिताची कामे त्यांनी केली आहेत. म्हणून मेहकर, लोणार तालुक्यातील समस्त तेली समाज बांधव रायमुलकर यांच्याच पाठीशी राहतील ,अशी ग्वाही आम्ही देत आहोत. याचा आम्हाला अभिमानही आहे. ते सातत्याने आमच्यासाठी झटत आले आहेत आता आम्ही त्यांना काही देण्याची वेळ आली आहे असे प्रतिपादन ॲड.गजानन क्षीरसागर यांनी व्यक्त केले.
संताजी नवयुवक मंडळाच्या वतीने आयोजित दिवाळी समाजमिलन सोहळा आज,४ नोव्हेंबरला संताजी नगर येथे पार पडला त्यावेळी बोलताना ऍड क्षीरसागर यांनी वरील विचार व्यक्त केले. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी समाजाचे अध्यक्ष मधुकरराव गायकवाड होते. प्रारंभी संताजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. वैयक्तिक व सामाजिक दृष्टीने महत्त्वाची अनेक कामे आमदार रायमुलकर यांनी केलेली आहेत .त्याबद्दल त्यांचा सत्कार संजय जुमडे यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रास्ताविक भाषणात ऍड गजानन क्षीरसागर पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सर्वच निर्णय अतिशय धाडसी व लोकोपयोगी आहेत. लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांसाठी पिक विमा कृषी, पंपांची वीज बिल माफी अशी अनेक उदाहरणे देता येतील. गेल्या पंधरा वर्षांपासून परिसरातील तेली समाज बांधव एकजुटीने आमदार रायमुलकर यांच्या पाठीशी राहिले आहेत व यापुढेही त्यांच्यासोबत राहण्याचा आमचा एकमुखी निर्णय आहे. निवडणुकीच्या निमित्ताने बाहेरगावच्या पार्सल निवडणूक रिंगणात उतरतात आणि नंतर पराभूत होऊन त्यांच्या गावी निघून जातात . परंतु केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव, आमदार संजय रायमुलकर आणि शिवसेनेचे पदाधिकारी हे मात्र अहोरात्र जनतेच्या सेवेत राबवत असतात, जनतेच्या सुखदुःखात सहभागी होत असतात, हे आम्ही नेहमी पाहतो. अचानक प्रकृती बिघडलेली असताना व हाताला सलाईनची हुक लावलेली असतानाही आमदार रायमुलकर आज आपल्या मेळाव्यात सहभागी झाले.समाज बांधवांना संजय रायमुलकर यांनी आज तागायत केलेल्या सहकार्याची अनेक उदाहरणे क्षीरसागर यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली.
सत्काराला उत्तर देताना आमदार संजय रायमुलकर म्हणाले की, मी कधीही जात-पात पाळली नाही. मतदार संघ हा माझा परिवार आहे, असे समजून सर्व समाज घटकांच्या उत्कर्षासाठी झटणारा मी माणूस आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मतदारसंघात विकास कामांच्या दृष्टीने त्यांची कुठलीही मदत मिळाली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आगळे वेगळे व्यक्तिमत्व असून ते अहोरात्र राज्याच्या विकासासाठी कार्यरत राहतात. गेल्या दोन वर्षात मेहकर मतदार संघात साडेचार हजार कोटी रुपयांची विकास कामे त्यांच्या सहकार्यामुळे आम्ही करू शकलो. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणाचा चांगला प्रयत्न करण्यात आला असून पिकविम्या साठी पूर्वी शेतकऱ्यांना जास्तीची रक्कम भरावी लागत होती म्हणून महायुती सरकारने एक रुपयात पिक विमा योजना सुरू केल्यापासून बहुतांश शेतकरी याचा लाभ घेत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे. कृषी पंपांच्या वीज बिल माफीसाठी शासनाने १५ हजार कोटींची तरतूद करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार संघाचा भरीव विकास करू शकलो याचे समाधान आहे. लोकांच्या हितासाठी अजून पुष्कळ काही साध्य करायचे आहे, असेही ते म्हणाले.दिवाळी मिलन सोहळ्याला तेली समाज बांधवांची विक्रमी उपस्थिती होती. यावेळी श्रीकृष्ण वाघमारे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुरेशतात्या वाळूकर, राजाभाऊ पाखरे ,विष्णुपंत पाखरे, सुडके मामा ,विश्वनाथ पाखरे, डॉ. दिगंबर वऱ्हाडे,नागेश सोनुने, डॉ. गंगाधर क्षीरसागर, ऍड. राजबिंडे, नागेश राजबिंडे, कुंदन हुले ,वैजनाथजी तोंडे, हनीफभाई गवळी, विशाल डोंगरे ,मंगेश तट्टे ,विजय सोनुने, अरुण गायकवाड, श्रीकृष्ण व्यवहारे, रूपालीताई वडणकर, गजानन वडणकर ,संतोष तोंडे ,नंदकिशोर सुर्वे, प्रभाताई राजबिंडे ,संजय जुमडे ,प्रताप शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व सोनुने यांनी केले.