सिंदखेडराजा आज आक्रोश मोर्चाने दणाणणार! गावागावातील शेतकऱ्यांची फौज सिंदखेडराजाकडे रवाना; दिलीप वाघ म्हणाले, मोर्चा परिवर्तनाचा हुंकार भरणारा ठरेल....

 
वाघ

 सिंदखेडराजा(ऋषी भोपळे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) मातृतीर्थ सिंदखेडराजात आज,२५ सप्टेंबरला ऐतिहासिक असा आक्रोश मोर्चा होत आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना नेते दिलीप वाघ यांच्या पुढाकारातून होत असलेला हा आक्रोश मोर्चा ऐतिहासिक आणि भव्यदिव्य ठरणार आहे.. हजारो शेतकऱ्यांचे वादळ या मोर्चाच्या रूपाने तहसील कार्यालयावर धडकणार आहे. त्यासाठी गावागावातून शिवसैनिक व शेतकऱ्यांची फौज सिंदखेडराजाकडे मार्गस्थ झाली आहे.

 

शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत, सहसंपर्कप्रमुख छगन मेहत्रे, आशिष रहाटे आदी नेतेमंडळी या मोर्चाला संबोधित करणार आहेत. राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मस्थळापासून हा मोर्चा निघेल, शहरातील प्रमुख मार्गावरून हा मोर्चा सिंदखेड राजा तहसील कार्यालयावर धडक देणार आहे. सिंदखेडराजा शहरात होणारी शेतकऱ्यांची गर्दी पाहता पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे. आजचा मोर्चा ऐतिहासिक ठरेल, परिवर्तनाचा हुंकार भरणारा असेल असे प्रतिक्रिया मोर्चाचे संयोजक दिलीप वाघ यांनी दिली आहे.