Amazon Ad

सिंदखेडराजा महाविकास आघाडीत धुसफूस! उबाठा सेनेच्या दिलीप वाघ यांचा डॉ.राजेंद्र शिंगणेंवर हल्लाबोल! म्हणाले, अजित पवार गटात जातांना लोकांना विचारून गेले होते काय?

 जनता गद्दारांना स्वीकारणार नाही म्हणाले......
 
 सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): डॉ.राजेंद्र शिंगणे शरद पवार गटात जाण्याच्या हालचाली जोरात सुरु असताना आता महाविकास आघाडीत धुसफूस सुरू झाली आहे. उबाठा शिवसेनेचे विधानसभा संघटक दिलीप वाघ यांनी डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. या मतदारसंघातील जनता गद्दारांना स्वीकारणार नाही असा घणाघात दिलीप वाघ यांनी केला आहे. त्यामुळे डॉ.राजेंद्र शिंगणे महाविकास आघाडीच्या उंबरठयावर असताना महाविकास आघाडीतून डॉ.राजेंद्र शिंगणे यांना विरोध सुरू झाला आहे. डॉ.शिंगणे यांनी गद्दारी केली, अजित पवार गटात गेले तेव्हा त्यांनी लोकांना विचारले होते काय? मेळावे घेतले होते काय? असा सवालही दिलीप वाघ यांनी केला आहे.
 पुढे बोलतांना दिलीप वाघ म्हणाले की, डॉ.शिंगणे यांना लोकांशी काहीही देणेघेणे नाही. शरद पवारांच्या पाठीर खंजीर खुपसून अजित पवार गटात जातांना त्यांनी लोकांची मते जाणून घेतली नाहीत. मग आता तुतारी हातांना घेतानांच लोकांची कशी आठवण होत आहे? असेही वाघ म्हणाले. काल डॉ. शिंगणे यांनी घेतलेला मेळावा स्क्रिप्टेड होता..या मेळाव्यात कुणी काय बोलायचं हे आधीच ठरलेलं होत..डॉ.शिंगणे यांना स्वतःला विजयाचा विश्वास नाही.लोकही त्यांच्यासोबत नाहीत त्यामुळे काल मेळाव्याचे नाटक करण्यात आले असेही दिलीप वाघ म्हणाले.. सिंदखेडराजा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवर उगाच डॉ.शिंगणे यांना लादू नका अशी मागणीही पक्षश्रेष्ठींकडे केल्याचे दिलीप वाघ म्हणाले. आम्ही शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते आहोत, उद्धव साहेब ठाकरे घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल हे सांगायलाही दिलीप वाघ विसरले नाहीत...
सोशल मीडियावर गद्दार हटाव सिंदखेडराजा बचाव मोहीम...
दरम्यान डॉ.राजेंद्र शिंगणे शरद पवार गटाच्या उंबरठ्यावर असताना आता महाविकास आघाडीतून डॉ.शिंगणे यांना विरोध सुरू झाला आहे. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सोशल मीडियावर डॉ.शिंगणे यांच्या विरोधात पोस्ट करीत आहेत. विशेष म्हणजे मशाल, तुतारी आणि पंजा या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची चिन्हे व्हायरल होणाऱ्या पोस्ट वर आहेत. "गद्दारांना पक्षात घेऊन उमेदवारी देऊन पवार साहेब काय साध्य करणार? गद्दार ते गद्दारच.. पक्ष स्वीकारेल पण जनता स्वीकारणार नाही.. गद्दार हटाव सिंदखेडराजा बचाव! अमानिष्ठावंतांना गद्दारांचा प्रचार करायला लावणार का? असा मजकूर लिहिलेल्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत...