चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार श्वेताताई महाले पाटील यांनी आज,२८ ऑक्टोबरला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी चिखली शहरातील खामगाव चौफुली येथून विराट महारॅली निघाली. बसस्टॅन्ड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जयस्तंभ चौक मार्गे ही रॅली राजा टॉवर येथे पोहोचली. त्यानंतर या रॅलीचे सभेत रूपांतर झाले. नजर जाईल तिथपर्यंत गर्दीच गर्दी.. वारकऱ्यांचा, मातृशक्तीचा जयघोष.. श्वेताताई तुम आगे बढोच्या घोषणा आणि जिकडे तिकडे फडफडणारे महायुतीतील घटक पक्षांचे झेंडे यामुळे एक वेगळाच उत्साह श्वेताताईंच्या समर्थकांमध्ये होता. राजा टॉवर येथे झालेल्या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्वेताताईंच्या कामाचे तोंड भरून कौतुक केले. श्वेताताईंनी केलेली कामे केवळ अडीच वर्षाच्या कार्यकाळात केली आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला..मात्र महायुती सरकार आल्यानंतर चिखली विधानसभा मतदारसंघासाठी आम्ही खजिना खुला केला असे म्हणत श्वेताताईंवर प्रेम करणारी ही गर्दी पाहून श्वेताताई यावेळी रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होतील असे प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी केले.यावेळी टाळ्यांचा एकच गजर झाला. यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ.गणेश मांटे, माजी आमदार विजयराज शिंदे, ज्येष्ठ नेते प्रकाशबुवा जवंजाळ, प्रतापसिंह राजपूत, रामकृष्णदादा शेटे, भाई विजय गवई, शेख अनिस, संजय चेके पाटील, शंतनू बोंद्रे यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले, परिवर्तन काय असते, विकास काय असतो हे गेल्या पाच वर्षात श्वेताताईंनी दाखवून दिले. चिखली विधानसभा मतदारसंघाचा खऱ्या अर्थाने आज शंखनाद झाला असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने श्वेता ताई रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होतील असा विश्वास असल्याचे ते म्हणाले. श्वेताताईंना कामे करण्यासाठी केवळ अडीच वर्षे मिळाली.कारण आधीचे महाविकास आघाडी सरकार विकास करत नव्हते, केवळ राजकारण करत होते.. विकासासाठी महाविकास आघाडी सरकारने फुटकी कवडी देखील दिली नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. महाविकास आघाडी सरकार जमिनीवर नव्हे तर फेसबुकवर चालायचे. आघाडी सरकारच्या कार्यकाळात श्वेताताईंना खूप संघर्ष करावा लागला असे ते म्हणाले. मात्र महायुती सरकार आल्यानंतर आम्ही चिखलीच्या विकासासाठी खजिना खुला केला असे ते म्हणाले. कोणते काम केले पाहिजे यासाठी आमदारांना दृष्टी असली पाहिजे.. त्यामुळे श्वेता ताईंनी ती दृष्टी दाखवत शेतकऱ्यांच्या शेत रस्त्याची कामे प्राधान्याने केली. आता पुन्हा महायुती सरकार येणार आहे.त्यामुळे तुम्ही निश्चिंत रहा, उरलेल्या शेत रस्त्यांची कामे पुढच्या एक वर्षात पूर्ण करू असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
श्वेताताईंनी मने जोडली..
श्वेताताईंनी रस्त्याच्या माध्यमातून केवळ गावे जोडली नाहीत तर अनेकांची मने जोडण्याचे काम केले असे गौरवोद्गार देवेंद्र फडणवीस यांनी काढले. अडीच वर्षांत महायुती सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. जनतेच्या हितासाठी वेगाने निर्णय घेतले. शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज मिळाली पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी होती. महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र वीज कंपनी तयार केली. पुढच्या १८ महिन्यांत या कंपनीचे काम पूर्ण होणार असून त्यानंतर महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना आम्ही दिवसा १२ तास वीज देऊ असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. शेतकऱ्यांच्या बिलाचे पैसे आता सरकार भरणार आहे असेही फडणवीस म्हणाले. मागेल त्याला सौर कृषी पंप याचा निर्णय देखील आम्ही घेतला आहे, त्यामुळे पुढची २५ वर्षे शेतकऱ्यांना मोफत वीज मिळेल असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. पैनगंगा - नळगंगा- वैनगंगा हा नदीजोड प्रकल्प आता होणार आहे.या प्रकल्पामुळे बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी सुजलाम सुफलाम होणार आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. लाडक्या बहिणींसाठी घेतलेला "माझी लाडकी बहीण योजना" हा निर्णय सुपरहिट झाल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. पुढच्या काळात १ कोटी महिलांना लखपती दीदी बनवायचे आहे असेही ना.फडणवीस म्हणाले.
आपल्या भाषणातून देवेंद्र फडणवीस यांनी महायुती सरकारच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती दिली. विरोधकांवर हल्लाबोल करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विरोधक महिलांच्या योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेले. मात्र आमचा हेतू शुद्ध असल्यामुळे त्यावर काहीही झाले नाही. विरोधकांना पराभव स्पष्ट दिसत आहे त्यामुळे महायुती सरकारच्या योजनांबाबत जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचे काम विरोधक करत असल्याचा आरोप ना.फडणवीस यांनी केला. चिखली विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी श्वेताताई हाच एकमेव पर्याय असल्याचेही देवेंद्र फडणवीस म्हणाले...
चिखली मतदारसंघ माझे कुटुंब: सौ श्वेताताई महाले पाटील
यावेळी बोलतांना श्वेताताई महाले पाटील म्हणाल्या की, २०१७ साली स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांच्या सल्ल्याने मी राजकारणाला सुरूवात केली. उदयनगर जिल्हा परिषद सर्कल पासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केल्याचे त्या म्हणाल्या. तेव्हापासून आतापर्यंत अनेक संघर्ष वाट्याला आले मात्र या संघर्षात जनता माझ्या सोबत होती. जिल्हा परिषद सदस्य असताना जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांकडे जात होते..तेव्हा मुख्यमंत्री असताना फडणवीस साहेबांनी विकासनिधी दिला. विकासाच्या राजकारणामुळे चिखली विधानसभा मतदारसंघातील मायबाप जनतेचे आशीर्वाद मिळाले. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई आम्ही जिंकलो आणि या जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली असे श्वेताताई म्हणाल्या. मात्र निवडणुकीनंतर अभद्र अशी महाविकास आघाडी सत्तेत आली आणि जिल्हा परिषद सदस्य असताना जो निधी मिळाला होता त्यावर स्थगिती आणण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केल्याचे श्वेताताई म्हणाल्या.
यावेळी श्वेताताईंनी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या वीजप्रश्नावर केलेल्या आंदोलनाबद्दल माहिती दिली. कोविड काळात मक्का खरेदी साठी केलेल्या आंदोलनाबद्दलही श्वेता ताईंनी भाष्य केले. भाजपची आमदार असल्याने महाविकास आघाडी सरकारने अतिवृष्टीच्या मदतीपासून चिखली विधानसभा मतदारसंघाला दूर ठेवल्याचेही त्या म्हणाल्या. महायुती सरकार आल्यानंतर चिखली विधानसभा मतदारसंघात ४०० किमी लांबीचे शेत रस्ते आम्ही मंजूर केले. त्यातील शंभर ते दीडशे किलोमीटर रस्त्यांचे काम पूर्ण झाल्याचे श्वेताताई म्हणाल्या. याशिवाय मतदार संघातील दोन गावांना जोडणारे १२२ रस्ते पूर्ण केल्याचे श्वेताताई म्हणाल्या. मतदारसंघात पाण्याची समस्या होती, अनेक मायमाऊल्यांना अनेक किलोमीटर अंतरावरून डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणावे लागायचे मात्र आता मतदार संघातील ९५ टक्के गावात जलजीवन मिशनची कामे झाल्याचे श्वेताताई म्हणाल्या.फडणवीस साहेबांनी भरभरून निधी दिल्याने माय-माऊलींची सेवा मला करता आली असे त्या म्हणाल्या. चिखली शहरात देखील १३२ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन केले असून आता चिखलीकरांची तहान भागणार असल्याचे श्वेताताई म्हणाल्या. चिखली मतदारसंघ माझा परिवार आहे, या मतदारसंघाला मी काहीही कमी पडू देणार नाही असा शब्दही यावेळी श्वेताताईंनी दिला. गेल्या वेळेला मतदानरुपी आशीर्वाद दिल्यामुळेच मी ही कामे करू शकले..आता पुन्हा तीच वेळ आली आहे..
केलेली कामे घेऊन मी तुमच्यासमोर आहे..अडीच वर्षांचा कमी काळ मिळूनही अनेक कामे आपण पूर्ण केली. काही कामे प्रगतीपथावर आहेत, ती कामे पूर्ण करायची असल्याने मला पुन्हा तुमच्या आशीर्वादाची गरज असल्याचे श्वेताताई यावेळी म्हणाल्या. "सबका साथ सबका विकास" या भारतीय जनता पार्टीच्या तत्त्वानुसार सर्व समाजाला न्याय देण्याचे काम महायुती सरकारने केले आहे.यापुढे याच विचारांवर पुढे जाणार असल्याचे त्या म्हणाल्या. गेल्यावेळी तुम्ही माझ्या पाठीशी जसे उभे होतात यावेळी तसेच आशीर्वाद देत तुमच्या लाडक्या बहिणीला सेवेची संधी द्या असे आवाहन शेवटी श्वेताताई महाले यांनी केले.