ब्रेन ट्यूमर ग्रस्त अक्षतासाठी श्वेताताई ठरल्या देवदूत!जन आशीर्वाद यात्रेदरम्यान औक्षण करून अक्षताने दिल्या श्वेताताईना शुभेच्छा
Nov 13, 2024, 12:35 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):जीवनदान हे जगातले सर्वश्रेष्ठ दान आहे, कारण माणूस जिवंत राहिला तरच तो पुढचे आयुष्य उपभोगू शकेल. असे जीवनदान देणारी व्यक्ती ही देवदूतच ठरते. अशी देवदूताची भूमिका आ. श्वेताताई महाले यांनी वठवली आणि चिमुकल्या अक्षताची ब्रेन ट्यूमरच्या पाशवी विळख्यातून मुक्तता केली. योगायोगाने दि. १२ नोव्हेंबर रोजी आपल्या निवडणूक प्रचारार्थ आयोजित केलेल्या जन आशीर्वाद दौऱ्यादरम्यान आ. श्वेताताई महाले ह्या वैरागड येथे आल्या असता तेथील प्रचार फेरीमध्ये गावातल्या इतर महिलांप्रमाणे चिमुकल्या अक्षताने सुद्धा श्वेताताईंचे औक्षण करून त्यांचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या. श्वेताताईंनी केलेल्या अनमोल सहकार्याची ही अक्षदा कडून मंगलमय परतफेडच म्हणावी लागेल.
चिखली तालुक्यातील विठ्ठल टापरे यांची चार वर्षाची मुलगी अक्षता हिला ब्रेन ट्यूमरचा आजार असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, टापरे कुटुंबियाची परिस्थिती अतिशय सर्वसाधारण असल्यामुळे या आजारावरील महागडे औषधोपचार करणे ही त्यांच्या आवाक्याबाहेरील बाब होती. त्यामुळे, परिस्थिती समोर त्यांनी हात टेकले व निराश झाले. परंतु, स्थानिक सामाजिक कार्यकर्ते गजानन रसाळ आणि भाजपचे बूथ प्रमुख शिवाजी साठे यांनी त्यांना धीर दिला व अक्षता हिच्या आजाराबद्दलची माहिती आ. श्वेताताई महाले यांच्या कानी घातली. गोरगरिबांच्या मदतीसाठी नेहमीच धावून जाणाऱ्या आणि विशेषतः आरोग्य सेवेच्या बाबतीत सदैव संवेदनशील व तत्पर असलेल्या श्वेताताई महाले यांनी क्षणाचाही विलंब न लावता अक्षता हिच्या उपचारासाठी पुढील पावले उचलली. श्वेताताईंच्या मदतीने अक्षता टापरे हिला मुंबई येथील सुप्रसिद्ध अशा लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे रोग निदान यशस्वीपणे पार पडल्यानंतर तिच्या नि : शुल्क उपचाराची व्यवस्था त्यांनी करून दिली. लवकरच चिमुकल्या अक्षता हिच्यावर आवश्यक ते उपचार होऊन तिची ब्रेन ट्यूमरच्या जीवघेण्या आजारातून कायमची सुटका होणार आहे.
श्वेताताई ठरल्या देवदूत
राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवेचा वसा घेतलेल्या कर्तव्यदक्ष आणि संवेदनशील नेत्या असलेल्या आ. श्वेताताई महाले यांची संवेदनशीलता या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली. आजवर श्वेताताई महाले यांनी अनेक असाध्य व दुर्धर आजारांनी ग्रस्त असलेले रुग्ण अपघातामध्ये शेवटच्या घटका मोजणारे नागरिक अशी जीवन मरणाची झुंज देणाऱ्या रुग्णांना नवजीवन प्रदान केले, त्यांच्यासाठी श्वेताताई देवदूत ठरल्या. मुख्यमंत्री सहायता निधीतून १९३ रुग्णांवर तर सिद्धिविनायक ट्रस्ट, टाटा कॅन्सर मेमोरियल ट्रस्ट आदी विविध धर्मदाय संस्थांच्या माध्यमातून २०१ रुग्णांवर महाराष्ट्रातील सर्व सुविधांनी युक्त असलेल्या अद्यावत रुग्णालयात महागडे औषधोपचार तसेच शस्त्रक्रिया केल्या. याशिवाय विविध लहान मोठ्या आजारांनी ग्रस्त असलेल्या एक हजारापेक्षा अधिक रुग्णांना औषधोपचार व शस्त्रक्रियेसाठी आ. श्वेताताई महाले यांनी सर्वतोपरी सहकार्य केले. श्वेताताईंचे हे कार्य पाहता त्यांच्यासाठी देवदूत ही उपमा अनाठायी ठरणार नाही. या मानवतेच्या कार्यातून श्वेताताईंनी गोरगरिबांचे अमूल्य असे आशीर्वाद मिळवले असून ही पुण्याई निश्चितच त्यांच्या राजकीय वाटचालीस फलदायी ठरेल असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.