श्वेताताईंना वेगवेगळ्या समाज घटकांचा वाढता पाठिंबा! धनगर, कोळी आणि बंजारा समाजाकडून जाहीर समर्थन

 
चिखली :(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महायुतीतर्फे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवणाऱ्या आ. श्वेताताई महाले यांना दिवसेंदिवस विविध समाज घटकांचा पाठिंबा वाढत्या प्रमाणात मिळत आहे. १५ नोव्हेंबर रोजी धनगर, कोळी आणि बंजारा समाजाच्या सर्वोच्च संघटनांच्या वतीने आ. महाले यांना आपले समर्थन जाहीर जाहीर करण्यात आले असून त्या संदर्भातील पाठिंब्याची पत्रके देखील प्रसिद्ध करण्यात आली आहेत; त्यामुळे जसजशी मतदानाची तारीख जवळ येत आहेत तसतसे श्वेताताई महाले यांचे पारडे जड होत असल्याचे निदर्शनास येत आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या " सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास " या त्रिसूत्रीला अनुसरून आ. श्वेताताई महाले गेल्या पाच वर्षापासून चिखली विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधी म्हणून कार्य करत आहेत. सर्व समाज घटकांना सोबत घेऊन प्रत्येक लहान मोठ्या जातसमूहाची समान प्रगती व्हावी, शासनाच्या कल्याणकारी योजनांचे लाभ सर्व समाज घटकांपर्यंत पोहोचावे आणि विकासाच्या प्रक्रियेत सर्वांना सहभागी करून घेता यावे याकरिता श्वेताताई महाले सर्वतोपरी प्रयत्न करत आल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाला प्रत्येक जातसमूहामधून सामाजिक मान्यता मिळत असताना या निवडणूक प्रचारादरम्यान पाहायला मिळाले. 

   धनगर समाज संघर्ष समितीचा पाठिंबा
 राज्यसभेचे माजी सदस्य पद्मश्री डॉ. विकास महात्मे हे संस्थापक अध्यक्ष असलेल्या धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने आ. श्वेताताई महाले यांना चिखली मतदारसंघातून आपला पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. डॉ. महात्मे यांनी त्याबद्दलचे पत्रक आपल्या स्वाक्षरीसह प्रसिद्धीस दिले असून त्यामध्ये आ. श्वेताताई महाले यांनी केलेल्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख देखील महात्मे यांनी केला आहे. चिखली मतदारसंघातील धनगर समाजाच्या प्रत्येक मतदाराने श्वेताताई महाले यांना मतदान करावे असे आवाहन पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी या पत्रकाद्वारे केले आहे. 
 कोळी महासंघाकडून समर्थक
 कोळी समाज संघटनेची शिखर संस्था असलेल्या कोळी महासंघाच्या वतीने देखील आ. श्वेताताई महाले यांच्या उमेदवारीला आपला पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार रमेशदादा पाटील यांनी याबाबतचे पत्रक आ. महाले यांना सुपूर्द केले असून त्यामध्ये श्वेताताई महाले यांनी कोळी समाजाच्या मागण्यासंदर्भात केलेल्या कामांबद्दल समाधान व्यक्त केले आहे. येणाऱ्या काळात देखील श्रीमती महाले कोळी समाजाच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवून त्या सोडवण्याचा प्रयत्न करतील असा विश्वास पत्रकातून व्यक्त करण्यात आला असून चिखली मतदारसंघातील समस्त कोळी समाजाकडून आ. श्वेताताई महाले यांना आपला पाठिंबा असल्याचे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेशदादा पाटील यांच्यासह प्रकाश बोबडी आणि सरचिटणीस राजहंस टपके यांच्या या पत्रकार स्वाक्षऱ्या आहेत. 
 बंजारा क्रांती दलाचाही पाठिंबा
 आ. श्वेताताई महाले यांनी केलेल्या विकासकार्याची दखल घेऊन अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाच्या वतीने देखील त्यांना आपला पाठिंबा जाहीर करण्यात आला. संघटनेचे अमरावती विभागीय अध्यक्ष राजेश राठोड यांनी याबाबतचे पत्रक प्रसिद्ध केले असून आ. श्वेताताई महाले यांना विजयी करण्यासाठी चिखली मतदारसंघातील बंजारा मतदारांनी मतदान करावे असे आवाहन या पत्रकातून केले आहे.