धक्कादायक..! पिंपरी गवळी गावातून ६ ते ७ मुली गायब; अद्याप पत्ता नाही! गावकऱ्यांनी घेतली एसपींची भेट; शिवसेना जिल्हाप्रमुख बुधवतांचा सरकारला खडा सवाल,म्हणाले...

 
 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा जिल्ह्यातून बेपत्ता होणाऱ्या मुलींचे आणि महिलांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. विशेष म्हणजे अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटना देखील अलीकडच्या काळात वाढले आहेत. मोताळा तालुक्यातील पिंपरी गवळी या गावातून अलीकडच्या काही महिन्यात ६ ते ७ मुली गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही दिवसानधी एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले होते. तशी तक्रार देखील संबंधित पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. मात्र महिना उलटून देखील मुलीचा शोध लागला नाही..त्यामुळे पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी गावकऱ्यांसह आज एसपी ऑफिसवर धडक दिली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत, महिला नेत्या जयश्री शेळके या देखील गावकऱ्यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा देखील केली. मुलीचा तात्काळ शोध घेण्यात यावा अशा मागणीची निवेदन यावेळी देण्यात आले.
   यावेळी माध्यमांशी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत म्हणाले की, एका गावातून एवढ्या मोठ्या प्रमाणात मुली बेपत्ता होतात मात्र पोलीसांचे धोरण वेळकाढूपणाचे आहे. हा प्रश्न केवळ एका गावापुरता मर्यादित नाही, संपूर्ण तालुक्यात जिल्ह्यात आणि राज्यात किती मुली बेपत्ता झाल्या आहेत, किती अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले आहे... त्यापैकी किती मुलींचा शोध लागला याची आकडेवारी सरकारने जाहीर करायला पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते आहे, त्यामुळे या सगळ्या प्रकाराला देवेंद्र फडणवीस देखील जबाबदार आहेत. त्यांनी स्वतः मुलींच्या बेपत्ता प्रकरणात लक्ष घालून पोलीस यंत्रणेला आवश्यक त्या सूचना द्यायला पाहिजेत असे बुधवंत म्हणाले. लेकी बाळींची सुरक्षा या राज्यात होते की नाही? असा खडा सवालही बुधवंत यांनी केला आहे.