पाठींबा म्हणता म्हणता दचकले..मग म्हणाले शुभेच्छा! रविकांत तुपकरांच्या आंदोलनाच्या प्रश्नावर आ. गायकवाडांची प्रतिक्रिया ...

 

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी आज त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १९ सप्टेंबरला बुलडाण्यात येत आहेत, संगम चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.

शिवाय शहरातील २६ स्मारकांचे अनावरण देखील याच दिवशी होणार आहे. त्याबद्दलची माहिती आ.गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. आ.गायकवाड यांच्या पत्रकार परिषदेत इतर मुद्यांवरही पत्रकारांनी आ.गायकवाड यांना छेडले. आ. गायकवाडांनी नेहमीच्या शैलीत सगळ्यांच प्रश्नांना उत्तरे दिली. रविकांत तुपकर यांच्या सुरू असलेल्या आंदोलनावरून पत्रकारांनी आ.गायकवाड यांना छेडले..यावेळी आमदार गायकवाड आधी पाठींबा म्हणता म्हणता दचकले...नंतर त्यांनी शुभेच्छा असल्याचे सांगितले...

आ.गायकवाड यांची पत्रकार परिषद असली की वेगवेगळ्या खमंग बातम्या मिळणार याची खात्री असतेच...त्यामुळे पत्रकार परिषद कुठल्याही विषयाची असली तरी त्यात दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या राजकारणावर भाष्य होतेच..आजची पत्रकार परिषद देखील त्याला अपवाद ठरली नाही..आधी मुद्द्याच बोलून झाल्यावर पत्रकारांनी स्थानिक राजकारणावर प्रश्न विचारले..हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलेल्या चॅलेंज बद्दल विचारल्यावर मी त्यांना गांभीर्याने घेत नाही, त्यांनी आमदार असताना काय दिवे लावले? असा सवाल केला.
पा.....शुभेच्छा...
सिंदखेडराजा येथे रविकांत तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाकडे तुम्ही कसे पाहता, तुमचा आंदोलनाला पाठिंबा आहे का? असा सवाल पत्रकारांनी केला. त्यावर माझा त्यांना पा...शुभेच्छा आहेत असे आ.गायकवाड म्हणाले.पत्रकारांनी पुन्हा छेडण्याचा प्रयत्न केला त्यावर आ.गायकवाड यांनी हात जोडले व माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत म्हणाले....