उद्या २ मे रोजी शिवसेनेचा धडक ट्रॅक्टर मोर्चा! शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – शिवसेना(उबाठा) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांचे आवाहन

 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने उद्या २ मे रोजी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे. शेतकरी बांधवांनी आपल्या ट्रॅक्टरसह मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन शिवसेना(उबाठा) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत करण्यात यांनी केले आले.
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेली संपूर्ण कर्जमाफीची वचने अद्यापही पूर्ण केली नाहीत. तसेच सातबारा कोरा, वीज बिल माफी, पीक विमा, शेतीमालाला योग्य भाव, सिंचन अनुदान व वन्य प्राण्यांपासून संरक्षण यांसारख्या प्रमुख मागण्या प्रलंबित आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा ट्रॅक्टर मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
शिवसेना उबाठाचे आमदार सिद्धार्थ खरात, जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, प्रवक्त्या जयश्रीताई शेळके यांच्या नेतृत्वाखाली हा ट्रॅक्टर मोर्चा निघणार आहे. 
मोर्चाच्या मुख्य मागण्या पुढीलप्रमाणे:
  • 1. संपूर्ण कर्जमाफीची त्वरित अंमलबजावणी करावी.  
  • 2. सोयाबीन, कापूस, मका यासह सर्व शेतीमालाला योग्य हमीभाव द्यावा.  
  • 3. शेतकऱ्यांना अटीशिवाय पीक विमा मिळावा.  
  • 4. तुषार सिंचन व ठिबक सिंचनासाठी रखडलेले अनुदान वितरीत करावे आणि वन्य प्राण्यांपासून शेतमालाचे संरक्षण व्हावे म्हणून तार कंपाऊंड बसवावे.  
  • 5. शेतकऱ्यांची संपूर्ण वीजबिल माफी करून शेतीसाठी मोफत वीज द्यावी.  
  • 6. पाणीटंचाई व जिल्ह्यातील इतर महत्वाच्या मागण्या तात्काळ निकाली काढाव्यात
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा उभारण्यासाठी २ मे रोजी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर हा भव्य ट्रॅक्टर मोर्चा होणार आहे. शेतकऱ्यांनी ठरलेल्या दिवशी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला आवाज बुलंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.