

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उबाठा शिवसेना आक्रमक! अवकाळीच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या; जालिंदर बुधवत यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी...
Apr 4, 2025, 14:49 IST

बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गेल्या दोन तीन दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी,अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी केली आहे.

आज ४ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी बुलडाणा यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात तसेच प्रा डी एस लहाने सर यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन देण्यात आले.यात नमूद आहे की, जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले आहे. घाटावर आणि घाटाखाली दोन्ही भागातील तालुक्यात शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा थेट फटका बसला आहे. पशुधनाची देखील हानी झाली आहे. रब्बी हंगामातील पिके गहू, ज्वारी, मका, कांदा बियाणे, चिया तसेच फळ लागवड क्षेत्राला सर्वाधिक नुकसान सहन करावे लागले आहे. पपईसह आंबा आणि इतर लिंबूवर्गीय फळ पिकांची झाडे उन्मळून पडली आहे. गतवर्षीच्या पीक विम्याला झालेला उशीर त्यातच खरीप हंगामातील उत्पादनाला भाव हमी न मिळाल्याने शेतकरी आधीच आर्थिक संकटात आहेत. त्यामुळे पावसाच्या या अवकृपेने पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर संकट कोसळले असून या नुकसानीचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी तालुका प्रमुख लखन गाडेकर, अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष मोहम्मद सोफियान, आशिष बाबा खरात, एकनाथ कोरडे, युवासेना शहर प्रमुख अनिकेत गवळी, राहुल जाधव, सागर हिवाळे, किशोर सुरडकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.