नैसर्गिक आपत्ती बाधितांच्या बँक खात्यावर ५९२ कोटी ३४ लाखाची मदत डीबीटीद्वारे वर्ग! बुलढाणा जिल्ह्यातील ६७४ लाभार्थींच्या खात्यात १ कोटींची रक्कम जमा;पालकमंत्री मकरंद पाटील यांची माहिती.

 
 बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अतिवृष्टी, पूर, अवेळी पाऊस, दुष्काळ, वादळी वारा व गारपीट या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकरी व अन्य घटकांना राज्य शासनाने वेळोवेळी शासन निकषानुसार मदत जाहीर केली होती. यातील ५ लाख ३९ हजार ६०५ लाभार्थ्यांना ५९२ कोटी ३४ लाख ९० हजार ५३० रुपयांची मदत संबंधित लाभार्थ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यावर मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत डीबीटीद्वारे आज वर्ग करण्यात आली आहे. यात बुलढाणा जिल्ह्यातील ६७४ लाभार्थींच्या खात्यात १ कोटी २ लाख ५४ हजार ३८७ रुपयांची रक्कम जमा करण्यात आल्याची अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री ना.मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.
आधारसंलग्न बँक खात्यावर डीबीटीद्वारे वर्ग करण्यात आलेल्या मदतीमध्ये अतिवृष्टी/पूर सन २०२२ सन २०२३, सन २०२४, अवेळी पाऊस २०२२-२३, व २०२३-२४, अवेळी पाऊस/अतिवृष्टी २०२३-२०२४, दुष्काळ २०२३ आणि जून २०१९ मध्ये वादळी वारा व गारपीट या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या लाभार्थींचा समावेश आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकरी व नागरीकांना शासनाकडून ही मदत त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर वर्ग झाल्यामुळे या घटकांना दिलासा मिळेल, असा विश्वासही मदत व पुनर्वसन मंत्री श्री. जाधव-पाटील यांनी व्यक्त केला.
मंत्री मंत्री श्री. जाधव-पाटील यांनी सांगितले, या मदतीमध्ये अमरावती विभागामध्ये ४ हजार ६७१ लाभार्थ्यांना ७ कोटी ४० लाख २९ हजार ८२० रुपयांची मदत आधारसंलग्न बँक खात्यावर वर्ग केली आहे. यात अकोला जिल्ह्यातील ३६३ लाभार्थ्यांना ५१ लाख ९६ हजार ९४२ रुपये, अमरावती जिल्ह्यातील १ हजार ६३० लाभार्थ्यांना ३ कोटी ६१ लाख ८१ हजार ८८९ रुपये, बुलढाणा जिल्ह्यातील ६७४ लाभार्थींना १ कोटी २ लाख ५४ हजार ३८७ रुपये, वाशिम जिल्ह्यातील ४०१ लाभार्थींना ४९ लाख १९ हजार ४८८ रुपये तर यवतमाळ जिल्ह्यातील १ हजार ६०३ लाभार्थींना १ कोटी ७४ लाख ७७ हजार ११८ रुपयांची मदत वर्ग केली आहे.