चिखलीची रेणुका माता यात्रा! आ. श्वेताताईंनी घेतली अधिकाऱ्यांची नियोजनात्मक बैठक! भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी उपाययोजना करण्याच्या दिल्या सूचना...

 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): यंदा १२ एप्रिलला चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चिखलीच्या रेणुका मातेची यात्रा आहे. दरवर्षी हनुमान जयंतीला होणाऱ्या यात्रा महोत्सवात लाखो भाविक सहभागी होतात. त्यामुळे यात्रेच्या अनुषंगाने चिखली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी अधिकाऱ्यांची नियोजनात्मक बैठक घेतली. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावाही यावेळी आ. श्वेताताईंनी घेत आवश्यक त्या सूचना दिल्या.

 गर्दीच्या ठिकाणी नगरपालिका प्रशासनाने भाविकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. रेणुका माता वहन मिरवणुकीच्या मार्गावरील सर्व पथदिवे व शहरातील पथदिवे, महापुरुषांच्या स्मारका जवळील दिवे नगरपालिकेने सुरू ठेवावेत अशा सूचना यावेळी आ. श्वेताताईंनी नगरपालिका प्रशासनाला दिल्या. अग्निशामक वाहने पाणी भरून अलर्ट ठेवावीत, पोलीस प्रशासनाने आवश्यक तो बंदोबस्त मागून चौका चौकात बंदोबस्ताचे नियोजन करावे अशा सूचना आमदार श्वेताताईंनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व त्यांची टीम सज्ज राहिली पाहिजे असेही आ. श्वेताताईंनी सुचवले.
बैठकीला तहसीलदार संतोष काकडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत बिडगर, चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार संग्राम पाटील, रेणुका देवी संस्थांची विश्वस्त तसेच इतर  अधिकारी व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते..