रेकॉर्ड..! चिखली विधानसभा मतदारसंघात तब्बल ९१६९ घरकुल मंजूर; लाभार्थ्यांना आमदार श्वेताताईंचे हस्ते मंजुरीपत्रांचे वाटप; श्वेताताई म्हणाल्या,....."तर तक्रार करा..!!'

 

 चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ग्रामविकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा दोन सन २०२४-२५ अंतर्गत २०० लाख लाभार्थ्यांना मंजुरीपत्र वितरण व १० लाख लाभार्थ्यांना घरकुलाचा प्रथम हप्ता वितरण कार्यक्रमाचे आयोजन बालेवाडी पुणे येथे केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आयोजित करण्यात आलेला होता. सदर कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह राज्यातील अनेक मंत्रीगण हजर होते. याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून चिखली पंचायत समिती स्तरावर आ. श्वेताताई महाले यांच्यातर्फे विधानसभा मतदारसंघातील ९१६९ घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना मंजुरपत्र वितरण करण्यात आले.

सदर कार्यक्रमांमध्ये आ. श्वेताताई महाले यांनी शेकडो लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वितरण केले. चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या चिखली तालुक्यातील ग्रामीण भागासाठी सुमारे ६७२५ व बुलढाणा तालुक्यामध्ये येणाऱ्या ग्रामीण भागातील २४५४ एवढी घरकुले मंजूर झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वचनाची पूर्तता करण्यासाठीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात हा वचनपूर्ती सोहळा असून मुख्यमंत्र्यांनी अगोदर मंजूर अनुदानामध्ये सुमारे ५० हजार रुपयांची घसघशीत वाढ केली असल्याचे घोषित केले असल्याचे सांगून घरकुल किंवा इतर योजना मिळण्यासाठी पैसे मागत असतील तर त्यांची त्वरित तक्रार करा, अशा लोकांवर त्वरित कार्यवाही करण्यात येईल, असे आ. श्वेताताई महाले यांनी सर्वांना आश्वस्त केले. चिखली पंचायत सदस्य सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला गटविकास अधिकारी गजानन पोफळे, भाजपा जिल्हा सचिव डॉ. कृष्णकुमार सपकाळ, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पोफळे, विश्वंभर शेळके, विस्तार अधिकारी सचिन पाटील, शालिनी जाधव यांची उपस्थिती होती...