आ.धीरज लिंगाडेंचा गड उध्वस्त करण्याची रविकांत तुपकरांची तयारी? अमरावती पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातही तयारी करण्याची घोषणा...
Feb 26, 2025, 10:57 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी काल, २५ फेब्रुवारीला बुलढाण्यात पदाधिकारी व शेतकऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत रविकांत तुपकर यांनी संघटनात्मक बांधणीवर जोर दिला. क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या महत्त्वाच्या नियुक्त्या ३ मार्चला पुण्यात आयोजित बैठकीत करणार असल्याचेही रविकांत तुपकर म्हणाले. दरम्यान संघटनेच्या विस्तारावर देखील रविकांत तुपकर यांनी फोकस केला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयारीला लागण्याचे आदेशही त्यांनी कार्यकर्त्यांना दिले. याशिवाय अमरावती पदवीधर मतदारसंघात आणि शिक्षक मतदार संघातही संघटनेचा विस्तार करणार असल्याचे ते म्हणाले.रविकांत तुपकर यांच्या या विधानावरून राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवार देऊन रविकांत तुपकर आ.धीरज लिंगाडेंसमोर आव्हान उभे करणार का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारल्या जाऊ लागला आहे..
गृहराज्यमंत्री अशा महत्त्वाच्या पदावर असलेल्या रणजीत पाटलांना पराभूत करून धीरज लिंगाडे पदवीधर मतदारसंघातून निवडून आले होते. खरे तर प्रतिस्पर्धी उमेदवार पाहता लिंगाडे यांच्या विजयाची हमी खुद्द त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनाही नव्हती. मात्र जुन्या पेन्शनचा मुद्दा गाजला आणि लिंगाडेंच्या गळ्यात आमदारकीची माळ पडली. पहिल्यांदा आमदार झाल्याने लिंगाडे आपला कार्यकाळ गाजवतील अशा आशा त्यांना निवडून देणाऱ्यांना होत्या, मात्र आमदार म्हणून अद्याप पाहिजे तशी छाप लिंगाडे यांनी सोडली नसल्याची चर्चा होत असते. अशा स्थितीत अमरावती पदवीधर मतदार संघासाठी तयारी करण्यात असल्याचे सांगत रविकांत तुपकर यांनी धुराळा उडवून दिला आहे.
सुशिक्षित तरुणांमध्ये रविकांत तुपकर यांची मोठी क्रेझ आहे, जुन्या पेन्शनच्या मुद्द्यावर ही रविकांत तुपकर यांनी अनेकदा आक्रमक भूमिका घेतली आहे त्यामुळे रविकांत तुपकर यांनी केलेली ही घोषणा लक्ष वेधणारी आहे...