रविकांत तुपकरांच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला विविध पक्ष - संघटनांचा मिळतोय पाठिंबा!

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख व गायत्री शिंगणे यांचे आंदोलन स्थळी भेट देवून दिला पाठिंबा..
 
सिंदखेडराजा
सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे राष्ट्रमाता जिजाऊंच्या राजवाड्यासमोर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे. आज ५ सप्टेंबर रोजी आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. दरम्यान या आंदोलनाला विविध संघटना तसेच पक्षांचा पाठिंबा मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन रविकांत तुपकर यांच्याशी चर्चा केली व या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला तसेच गायत्री शिंगणे यांनी देखील आंदोलन स्थळी पोचून या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे.
सोयाबीन - कापूस दरवाढ, पिकविमा, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची १००% नुकसान भरपाई, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती यासह शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्काच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी ४ सप्टेंबर रोजी राष्ट्रमाता जिजाऊंचे दर्शन घेऊन बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन तुपकरांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्काच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी सुरू केलेल्या या लढ्याला आता सर्वच स्तरातून पाठिंबा मिळताना दिसून येत आहे.
राज्यभरातील विविध संघटना आणि पक्षांचे पदाधिकारी आपला पाठिंबा जाहीर करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन रविकांत तुपकर यांच्याशी चर्चा केली. आम्ही आपल्या सोबत असून या आंदोलनाला आमचा जाहीर पाठिंबा असल्याचे यावेळी मेहबूब शेख यांनी सांगितले. तसेच गायत्री शिंगणे यांनी देखील आंदोलन स्थळी पोहोचून रविकांत तुपकर यांची भेट घेतली व त्यांच्या या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा असल्याचे पत्रच त्यांनी रविकांत तुपकारांना सुपूर्द केले.
त्याचबरोबर ग्रामसेवक संघटनेसह विविध संघटनांनी तुपकरांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दरम्यान काल प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे यांच्यासह तहसीलदार, कृषी अधिकारी, पिकविमा कंपनीचे अधिकारी, गटविकास अधिकारी यांनी आंदोलन स्थळी पोहोचून रविकांत तुपकर यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. आंदोलन मागे घेण्याची विनंती देखील या अधिकाऱ्यांनी यावेळी केली. परंतु जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत माघार नाही, असे रविकांत तुपकर यांनी ठामपणे सांगितले.
शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या पिकविमा कंपनीवर गुन्हे दाखल करून त्यांना शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यास बाध्य करा व बाकी मागण्यांसंदर्भात राज्य सरकारने ठोस निर्णय घ्यावे, असे यावेळी रविकांत तुपकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.
हे आंदोलन टप्प्याटप्प्याने सुरूच राहणार असून शासनाने गांभीर्याने दखल न घेतल्यास हे आंदोलन राज्यभर पेटेल, असा इशाराही यावेळी रविकांत तुपकर यांनी दिला.