रविकांत तुपकरांच्या आंदोलनाचा वणवा गावागावात पेटला! शेकडो गावांत निघाल्या प्रभातफेऱ्या; रविवारी चक्काजाम करणार, समृद्धीवर घुसणार...

 
Gjcv
चिखली(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मातृतीर्थ सिंदखेडराजात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे आंदोलन गेल्या ३ दिवसांपासून सुरू आहे. सोयाबीन - कापसाची दरवाढ, पीक विम्याचा प्रश्न, जंगली जनावरांपासून शेतीपिकांचे रक्षण यासह विविध मुद्यांवर तुपकर आक्रमक झाले आहेत. तुपकर यांच्या आंदोलनाचा हा वणवा आता गावागावात पेटत आहे.
आज,६ सप्टेंबरला आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. आज सकाळी जिल्ह्यातल्या शेकडो गावांत तुपकर यांच्या समर्थनार्थ प्रभातफेऱ्या निघाल्या. शेलोडी, सोमठाणा दिवठाणा,पेठ, सोनवाडी, भरोसा ,यासह विविध गावांत शेतकरी रस्त्यात उतरले. "औषध मारून फायदा नाही, सोयाबीन कापसाला भाव नाही" यासह विविध घोषणा गावागावात देण्यात येत होत्या.
रविकांत तुपकर यांची तब्येत खालावली...
दरम्यान रविकांत तुपकर यांची तब्येत आज खालावली आहे. डॉक्टरांच्या चमूने तुपकर यांची तपासणी केली. त्यावेळी रक्तातील साखर कमी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रविकांत तुपकर यांना अशक्तपणा देखील आला आहे. प्रशासनाच्या वतीने वारंवार तुपकर यांना अन्नत्याग मागे घेण्याची विनंती करण्यात येत आहे, मात्र जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे पडत नाहीत तोपर्यंत अन्नाचा एक कणही घेणार नसल्याचे तुपकर यांनी सांगितले आहे.