रविकांत तुपकरांनी मुख्यमंत्र्यांच्या समोर मांडला पिकविमा व नुकसान भरपाईचा प्रश्न..! सकारात्मक चर्चेने आशा पल्लवीत; प्रधान कृषी सचिवांचीही घेतली मंत्रालयात भेट....

 
 बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा ): पिकविमा आणि नुकसान भरपाई हा शेतकऱ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांचा हा प्रश्न घेऊन रविकांत तुपकर गल्ली ते दिल्लीपर्यंत लढा देत आहेत. आज २८ जानेवारी रोजी त्यांनी मुंबई येथे मंत्रालयात मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पिकविमा सोबतच गतवर्षीची राहिलेली नुकसान भरपाई तसेच ठिबक सिंचन अनुदान व शेतकऱ्यांच्या इतर समस्या आणि प्रश्नांबाबत सविस्तर मांडणी करून हे प्रश्न सोडवण्याचे आग्रही मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. मुख्यमंत्र्यांच्या दालनात झालेली चर्चा सकारात्मक झाल्याने शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागण्याची तुपकरांना अपेक्षा आहे. तसेच यावेळी रविकांत तुपकर यांनी राज्याचे प्रधान कृषी सचिव विकासचंद्र रस्तोगी यांची देखील भेट घेऊन पिक विमा व इतर प्रश्न प्राधान्य क्रमाने मार्गी लावण्याबाबत चर्चा केली.
 
 
   बुलडाणा जिल्ह्यासह राज्यातील लाखो शेतकऱ्यांची पिकविम्याची रक्कम तसेच गतवर्षीची नुकसान भरपाईची रक्कम कंपनीकडे रखडली आहे. सदरची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावी यासाठी रविकांत तुपकर सातत्याने प्रयत्न करीत आहेत. आज २८ जानेवारी रोजी रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पिकविमा, गतवर्षीची राहिलेली नुकसान भरपाई तसेच ठिबक सिंचन अनुदान यासह सोयाबीनचा भाव फरकातील अनुदान, सोयाबीनचे दरवाढ यासह शेतकऱ्यांच्या इतर समस्या मांडल्या. रविकांत तुपकरांनी मुख्यमंत्री ना. फडणवीस यांच्या समोर पिकविमाचा प्रश्न मांडताना सांगितले की, बुलढाणा जिल्ह्यात AIC पिकविमा कंपनीने गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामातील पोस्ट हार्वेस्टिंग अंतर्गत पात्र असलेल्या व चुकीचे कारण दाखवून अपात्र केलेल्या १ लाख २६ हजार २६९ शेतकऱ्यांना अद्याप पिकविम्याचा मोबदला दिला नाही.
   त्याचबरोबर खरीप हंगामात चुकीचे कारणे देवून अपात्र केलेल्या ७० हजार ८३१ शेतकऱ्यांना पिकविमा देण्याचे कंपनीने मान्य केले आहे. 'त्या' शेतकऱ्यांनाही कंपनीने अद्याप पिकविम्याचा मोबदला दिला नाही. पिकविम्यापोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २३३ कोटी ८३ लक्ष रु. रक्कम मिळणे अद्याप बाकी आहे त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील या शेतकऱ्यांची तसेच राज्यातील ज्या शेतकऱ्यांचे पीक विम्याची रक्कम बाकी आहे त्यांचे रक्कम तातडीने शेतकऱ्यांना मिळावी, यासाठी संबंधित कंपनीला आदेशित करावे अशी आग्रही मागणी रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे लावून धरली. यासोबतच गतवर्षीचे राहिलेले नुकसान भरपाई आणि ठिबक सिंचन अनुदानाचा प्रश्नही रखडला असल्याचे तुपकरांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. मुख्यमंत्र्यांच्या दालनात सविस्तर चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर रविकांत तुपकरांनी राज्याचे कृषी प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांची देखील भेट घेतली. मुख्यमंत्री महोदयांशी झालेले चर्चा आणि पिक विमा कंपन्या घेत असलेले आडमुठे धोरण याबाबतीत रविकांत तुपकरांनी कृषी प्रधान सचिव श्री रस्तोगी यांना अवगत केले. खुद्द मुख्यमंत्री आणि राज्याचे कृषी प्रधान सचिव यांनी पिक विमा आणि नुकसान भरपाई बाबत व ठिबक सिंचन अनुदान आश्वासक शब्द दिल्याने हा प्रश्न मार्गी लागण्याचे संकेत मिळाले आहेत. पिकविमा आणि नुकसान भरपाई या प्रश्नाबाबत रविकांत तुपकर सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करीत आहेत यापूर्वी त्यांनी कृषिमंत्री मा.ना.ॲड.माणिकरावजी कोकाटे यांची नाशिक येथे भेट घेऊन पिकविम्याचा विषय सविस्तर त्यांच्या निदर्शनास आणून दिला होता तर आता त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर हा प्रश्न मांडला आहे, मुख्यमंत्र्यांच्या दालनात झालेली सकारात्मक चर्चा आणि नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या पदरात पडण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.