

पोलिसांच्या हातावर तुरी देऊन रविकांत तुपकर गायब! उद्या मुंबईत आंदोलन होणारच; क्रांतिकारी शेतकरी संघटना आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम! पोलिसांची दहाच्यावर पथके तुपकरांच्या मागावर...
Mar 18, 2025, 15:34 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी उद्या १९ मार्चला मुंबईत आंदोलन करणार असल्याची घोषणा केली आहे. मुंबईच्या अरबी समुद्रात सातबारे बुडवून तुपकर यांच्या नेतृत्वात शेतकरी स्वतः कर्जमुक्त झाल्याची घोषणा करणार आहेत. शिवाय सोयाबीन आणि कापूस बुडवून देखील शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या आंदोलनाच्या माध्यमातून होणार आहे. दरम्यान रविकांत तुपकर यांचे हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न शासनाकडून सुरू झाला आहे. रात्रीपासूनच तुपकर यांचे महत्त्वाचे शिलेदार पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पोलिस अडवणूक करण्याची कुणकुण लागताच रविकांत तुपकर भूमिगत झाले आहेत. आज दुपारी एक व्हिडिओ प्रसिद्धीस देऊन रविकांत तुपकर यांनी आपण मुंबईत पोहचलो असल्याचा दावा करीत उद्याचे आंदोलन होईलच असा इशारा दिला आहे..
दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रविकांत तुपकर यांना जिल्ह्यातच अडवण्याचे आदेश पोलिसांना प्राप्त झाले होते. त्यानुसार रविकांत तुपकर यांना अडवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून झाला.पोलिस तुपकर यांच्या घरी गेले, मात्र त्याआधीच तुपकर यांनी पोलिसांना चुकांडा दिला आणि ते भूमिगत झाले. आता काहीही करून तुपकर यांना मुंबईत जाण्यापासून रोखण्याचे आदेश पोलिसांना आहेत. त्यानुसार पोलिसांची जवळपास दहाच्या वर पथके तुपकर यांचा शोध घेत असल्याची माहिती आहे.मात्र असे असले तरी याआधीच्या आंदोलनाचा अनुभव तुपकर यांच्या गाठी आहे.त्यामुळे आधी झालेल्या चुका टाळण्याचा प्रयत्न रविकांत तुपकर यांच्याकडून होत आहे. सूत्रांनी दिलेल्या पोलिसांनी शेतकरी कार्यकर्त्यांची एक फळी अडकवली असली तरी दुसरी फळी मात्र मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचे सांगण्यात येत आहे..त्यामुळे रविकांत तुपकर यांच्या या लक्षवेधी आंदोलनाकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत .