जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ ताकदीने लढणार - रविकांत तुपकरांचा निर्धार; कार्यकर्त्यांच्या भरगच्च उपस्थितीत संग्रामपूरात झाली बैठक...ताकदीने लढण्याचा केला निर्धार!

 
Tupkar
 संग्रामपूर (स्वप्निल देशमुख:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोकसभा निवडणुकीत आपल्याला जळगाव जामोद मतदारसंघातून अपेक्षित असे यश मिळाले नाही, परंतु आता त्यावेळी राहिलेल्या उणिवा आणि चुका भरून काढत येणारी विधानसभेची निवडणूक पूर्ण ताकदीने लढू. यासाठी शेतकरी, कष्टकरी, तरुणांचा सक्षम उमेदवार रिंगणात उभा करू अशी, घोषणा रविकांत तुपकर यांनी वरवट बकाल (ता.संग्रामपूर) येथे झालेल्या मेळाव्यात बोलतांना केली. रविकांत तुपकरांनी जळगाव जामोद मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक वरवट बकाल (ता.संग्रामपूर) काल, २३ सप्टेंबर रोजी आयोजित केली होती. पण या बैठकीला कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने उपस्थित झाल्याने या बैठकीचे रूपांतर मेळाव्यामध्ये झाले.  
       
यावेळी बोलतांना रविकांत तुपकर म्हणाले की, लोकसभा निवडणुकीमध्ये जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात आपल्याला अपेक्षित यश मिळाले नाही हे वास्तव आहे. या अपयशाची जबाबदारी मी स्वतः माझ्यावर घेतो. त्यावेळी राहिलेल्या उणिवा भरून काढण्यासाठी, जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी मी स्वतः जातीने या मतदार संघात ठाण मांडून लक्ष घालणार आहे. येणाऱ्या विधानसभेत जळगाव जामोद मतदार संघातून तगडा उमेदवार देऊन पूर्ण ताकदीने हा मतदारसंघ लढविणार असल्याची घोषणा रविकांत तुपकर यांनी केली. संघटनात्मक बांधणी व आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य जनता, तरुण अशा सर्वच घटकातील नागरिकांच्या भावना आणि आशीर्वाद आपल्या सोबत आहेत. त्यामुळे आता थोडीफार जी मरगळ आली असेल ती झटकून तयारीला लागा, शेतकरी-कष्टकऱ्यांचा अतिशय ताकदीचा उमेदवार देऊन जळगाव जामोद विधानसभा अतिशय ताकदीने लढविणार, अशी घोषणा यावेळी रविकांत तुपकरांनी यावेळी केली. या बैठकीला जळगाव जामोद विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पिकविमा,नुकसान भरपाईसाठी व सोयाबीन-कापूस दरवाढी प्रश्नी सत्ताधाऱ्यांना जाब विचारा...
या भागात अजूनही शेतकऱ्यांना पिकविमा मिळाला नाही, गेल्या वर्षी झालेल्या ढगफुटीच्या मदतीपासून ७००० लोकं वंचित आहेत, सोयाबीन-कापसाला भाव नाही, परंतु याकडे सत्ताधाऱ्यांचे लक्ष नाही, त्यामुळे सोयाबीन-कापूस दरवाढ, पिकविमा, नुकसान भरपाईसाठी सत्ताधाऱ्यांना जाब विचारा, या प्रश्नी आपण लवकच आक्रमक लढा उभारणार आहोत, या होणाऱ्या आंदोलनात ताकदीने सहभागी व्हा, असे आवाहन रविकांत तुपकरांनी यावेळी केले. यावेळी बोलतांना तुपकरांनी सत्ताधारी नेत्यांचा खरपूस समाचार घेतला.