सावरगाव डुकरे गावांत लोकशाही मार्गाने "रणकंदन"! गृहमंत्र्यांनी माफी मागावी म्हणून राहुल बोंद्रेंचे अन्नत्याग आंदोलन; भाजपचे कार्यकर्तेही त्याच गावात उपोषणाला बसले...

 
Chikhli

 चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून ओळख असलेल्या चिखलीचे राजकारण चांगलेच पेटण्याची चिन्हे आहेत. सावरगाव डुकरे या गावात माजी आमदार राहुल बोंद्रे आणि भाजपचे कार्यकर्ते आमने - सामने आले आहेत. शेतकऱ्यांच्या रक्ताच्या सहीने लिहिलेले निवेदन फाडल्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागावी, शेतकऱ्यांच्या रक्ताचा अपमान करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी आज,२३ सप्टेंबर पासून अन्यत्याग आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. तर दुसऱ्या बाजूला राहुल बोंद्रे यांनी जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे ९४ कोटी रुपयांचे थकीत कर्ज त्वरित भरावे यासह इतर मागण्यासाठी भाजप कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत .पवन डुकरे, संतोष काळे आणि अमोल डुकरे हे कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत. एकंदरीत चिखलीच्या राजकारणाची पार्श्वभूमी पाहता सावरगाव डुकरे गावात लोकशाही मार्गाने सुरू झालेले हे "रणकंदन" वेगळ्या मार्गावर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बुलडाणा दौऱ्या दरम्यान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी शेतकऱ्यांच्या रक्ताच्या सहीने लिहिलेले निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्याचा प्रयत्न केला होता. बुलडाणा येथील जयस्तंभ चौकात यावेळी चांगलाच राडा झाला होता, यावेळी पोलिसांशी झालेल्या झटापटीत निवेदन फाटले होते.दरम्यान आता त्याच मुद्द्यावरून राहुल बोंद्रे आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांच्या रक्ताची किंमत या सरकारला नाही, शेतकऱ्यांच्या रक्ताने लिहिलेले निवेदन फाडल्याबद्दल गृहमंत्र्यांनी माफी मागावी व संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी राहुल बोंद्रे यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. सत्यशोधक चळवळ तसेच शेतकरी चळवळीचे केंद्र राहिलेल्या सावरगाव डुकरे या गावात त्यांनी आजपासून हे आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत निवेदन फाडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत अन्न सेवन करणार नाही अशी भूमिका राहुल बोंद्रे यांनी घेतली आहे.
 
दरम्यान राहुल बोंद्रे यांच्या या आंदोलनाची कुणकुण लागतात भाजपनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. राहुल बोंद्रे यांनी जिल्हा बँक बुडवली, जिल्हा बँकेचे ९४ कोटी रुपयांचे कर्ज त्यांनी थकवले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात उभे राहावे लागत आहे असा आरोप करीत भाजप कार्यकर्ते पवन डुकरे, संतोष काळे, अमोल डुकरे अन्नत्याग आंदोलनाला बसले. राहुल बोंद्रे यांनी जिल्हा केंद्रीय बँकेचे ९४ कोटी रुपयांचे थकीत कर्ज त्वरित भरावे, राहुल बोंद्रे अध्यक्ष असलेल्या अनुराधा अर्बन बँकेच्या गैरव्यवहाराची चौकशी होऊन दोषींना कठोर शिक्षा व्हावी या मागण्यांसाठी भाजपचे कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत...